आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातुरात भरदिवसा चार लाखांची घरफोडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर शहरात भरदिवसा घरफोडी होण्याचे प्रमाण वाढले असून गुरुवारी सलग तिसरी चोरी झाली. विशालनगरातून चार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा पद्धतीने चोरी होण्याची आठवड्यातील ही चौथी घटना आहे.
धनंजय लोंढे हे आरटीओ कार्यालयात नोकरीला आहेत. गुरुवारी ते ड्यूटीवर गेले होते तर त्यांचे कुटुंबीय बाजारात. ही संधी साधून चोरट्यांनी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील 10 तोळे सोन्याचे दागिने व 70 हजार रोख असा सुमारे चार लाखांचा मुद्देमाल त्यांनी नेला. ही घटना समजल्यानंतर लोंढे यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण करून चोरट्यांचा माग शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.
आठवड्यात चार घरफोड्या : शहरात भरदिवसा घरफोडी होण्याचे प्रमाण वाढले असून आठवड्यातील ही चौथी घटना आहे. त्यामुळे नागरिकांनी धास्ती घेतली आहे. देशी केंद्र विद्यालयाशेजारी असलेल्या शिल्पा अपार्टमेंटमध्ये मंगळवारी घरफोडी करून चोरट्यांनी साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद साळुंके यांच्या घरात भरदिवसा ही चोरी झाली होती. साळुंके यांच्या पत्नी गावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील साडेपंधरा तोळ्याचे दागिने (किंमत चार लाख 65 हजार) लंपास केले. त्यानंतर बुधवारी विजय कॉलनी भागातील एका अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी हातसफाई केली. राहुल बिराजदार यांच्या घराचे कुलूप तोडून 69 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला होता.

पद्धत एकसारखीच
शहरात झालेल्या चारही चोर्‍या एकसारख्याच पद्धतीने झाल्या आहेत. चोरटे विशेषत: अपार्टमेंटमध्येच हातसफाई करत असून भरदिवसा कुलूप तोडून ऐवज लंपास करतात. ते सोने आणि रोख रक्कम घेऊन जातात, तर चांदी किंवा अन्य वस्तूला हातही लावत नाहीत.