आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

35 महिन्यांत 85 किलोमीटरपर्यंत चार लेन; आता उस्मानाबाद-सोलापूर अंतर एका तासात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- महाराष्ट्राच्या उत्तर-दक्षिण भागाला जोडणाऱ्या आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाचा वेग बनू पाहणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. सोलापूरपासून उस्मानाबादमधील रत्नापूरपर्यंतच्या (ता. कळंब) मार्गावरील २३ पैकी जवळपास १९ उड्डाणपुलांवरून वाहनांचा प्रवासही सुरू झाला आहे. त्यामुळे रत्नापूर ते सोलापूर हा ९९ किलोमीटरचा प्रवास वेगवान झाला आहे. एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण होईल, तर दुसऱ्या टप्प्यात रत्नापूर ते औरंगाबाद हा मार्ग २०१८ अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चौपदरीकरणाच्या कामामुळे तीर्थक्षेत्र तुळजापुरात येण्याचा भाविकांचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.    


खान्देशातील धुळे शहरापासून पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यापर्यंत ४०० किलाेमीटर राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ २१ जानेवारी २०१५ रोजी झाला. सोलापूरपासून या कामाला सुरुवात झाली. या टप्प्यातील सोलापूर ते रत्नापूर या ९९ किलोमीटर अंतरासाठी दिवसरात्र काम करून ३५ महिन्यांत ८५ टक्के काम पूर्ण झाले. या मार्गाच्या कामाची कालमर्यादा मार्च २०१७ पर्यंतची होती. रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया धिम्या गतीने झाल्यामुळे एक वर्षे काम उशिरा पूर्ण होत आहे. म्हणजेच पहिल्या टप्प्याचे संपूर्ण काम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होईल. 

 

वळणांना फाटा, सव्वा किलोमीटर अंतर वाचले
महामार्गाच्या विस्तारादरम्यान मार्गावर वळण कमी करणे अनिवार्य असते. धुळे-सोलापूर महामार्गाच्या कामादरम्यान पहिल्या टप्प्याचे मूळ निविदेतील सोलापूर ते रत्नापूर हे अंतर १०० किलोमीटर होते. वळणांना फाटा दिल्याने हे अंतर १.३ किलोमीटरने कमी झाले आहे. सुरतगाव, माळुंब्रा, येडशी, शिंगोली, कावलदरा या गावांना बायपास देण्यात आला आहे.   

 

 

३१८ हेक्टर जमिनीचे संपादन, शेतकऱ्यांना ४०० कोटी मावेजा 
महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन विभागाने पहिल्या ९९ किलोमीटरच्या टप्प्यातील विस्तारासाठी सुमारे ३१८ एकर जमिनीचे संपादन केले. त्यातून सुमारे १ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना ४०० कोटी रुपयांचा मावेजा मिळाला.   

 

एप्रिलपर्यंत दोन टोल नाके सुरू होणार   
९९ किलोमीटर मार्गाचा हा प्रवास विनाअडथळ्याचा, वेगवान होणार असला तरी वाहनधारकांना त्यासाठी रक्कम भरावी लागणार आहे. या मार्गावर तामलवाडी तसेच येडशी, अशा दोन ठिकाणी टोल नाके उभारण्यात आले. या नाक्याचेही काम प्रगतिपथावर आहे. मार्गाचे काम ७५ % पूर्ण झाल्यानंतर कंपनीकडून टोल आकारला जाऊ शकतो. एप्रिलपर्यंत (२०१८) हे टोल नाके सुरू होतील.

 

सर्वाधिक उंचीचा ७५ फुटांचा पूल   
या मार्गावर गावाला बायपास देण्यासाठी तसेच वळण संपवण्यासाठी कावलदराजवळ मोठ्या दरीमध्ये पूल उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. मार्गावरील सर्वात उंचीचा म्हणजे सुमारे ७५ फूट उंचीचा हा पूल अाहे. या मार्गावरील काही जुनी वृक्षसंपदा नष्ट झाली अाहे. मात्र, वडगाव परिसरात ७ किलोमीटरपर्यंतच्या मार्गावरील जुनी वडाची झाडे वाचवण्यात आली आहेत.

 

उस्मानाबाद शहरात सात उड्डाणपूल   
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर ते रत्नापूर या ९९ किलोमीटरच्या अंतरावर १८ उड्डाणपूल बांधण्यात येणार होते. मात्र, गरजुनेसार तब्बल ५ उड्डाणपूल वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे आता ही संख्या २३ वर गेली आहे. मूळ निविदेत उस्मानाबाद शहराच्या हद्दीत केवळ दोन उड्डाणपूल नमूद होते. मात्र, आता एकूण ७ उड्डाणपूल होत असल्याने उड्डाणपुलांचे शहर अशी उस्मानाबादला नवी ओळख मिळू शकते. यापैकी चार पुलांचे काम अद्याप बाकी असून, उर्वरित पुलांचे काम सुरू करण्यात आले आहे.   

 

बातम्या आणखी आहेत...