आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Loksabha, 35 Assembly Seat Give; Demanding Ramdas Athawale

राज्यात लोकसभेच्या चार, विधानसभेच्या 35 जागा द्या; रामदास आठवले यांची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - आरपीआयला लोकसभेच्या चार तर विधानसभेच्या 35 जागा द्याव्यात, अशी मागणी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. लातूर लोकसभेची जागाही आरपीआयलाच सोडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


काँग्रेस - राष्ट्रवादीला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी भीमशक्ती व शिवशक्ती महायुती हे प्रभावी अस्त्र असून रिपब्लिकन पक्षाची यात मोलाची भूमिका राहणार आहे, असेही आठवले यांनी या वेळी स्पष्ट केले. आठवले म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून रोखण्याचे स्वप्न होते. त्यासाठीच त्यांनी भीमशक्ती व शिवशक्ती युतीचा योग घडवून आणला होता. समाजबांधवांची इच्छा नसताना आम्ही दोन्ही काँग्रेसला शह देण्यासाठी या युतीला होकार भरला. आता भाजप-शिवसेनेनेही मोठ्या मनाने आरपीआयला झुकते माप द्यावे. लोकसभेच्या चार तर विधानसभेच्या 35 जागांची आमची मागणी आहे. सक्षम उमेदवार देण्यासाठी जागावाटप लवकर जाहीर करावे, अशीही मागणी त्यांनी केली.


हिंदुत्वाला विरोध, राममंदिर उभारणीचे समर्थन
शिवसेना-भाजपसोबतची आमची युती ही केवळ राजकीय स्वरूपाची असून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमचे त्यांच्याशी मतभेद आहेत. आंबेडकरवाद आम्ही कधीही सोडणार नाही. हिंदुत्ववादापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढल्या गेल्या तर त्याचा फायदा होईल. हिंदुत्ववादाला विरोध असला तरी अयोध्येत राममंदिर बांधण्याच्या भाजपच्या भूमिकेचे आठवले यांनी समर्थन केले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने जी जागा निश्चित केली आहे तेथे मंदिर उभारण्यास हरकत नसल्याचे ते म्हणाले. बुद्धगया मंदिर परिसरातील बॉम्बस्फोट हा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अपयशाचे फलित असून देशातील सर्वच बौद्ध मंदिरे व धार्मिक स्थळांना संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली.