औरंगाबाद-
आपेगाव-कुरणपिंप्री हा पूल बांधणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रादेशिक मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखालीच हा पूल कशामुळे खचला याचा शोध घेतला जाणार आहे. शासनाने हा पूल क्षतिग्रस्त होण्यामागील कारणे शोधण्यासाठी चार जणांची समिती गठित केली आहे.
सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता सी. पी. जोशी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. एका महिन्यात या समितीने शासनाला अहवाल द्यावयाचा आहे.
शासनाच्या वतीने बुधवारी सायंकाळी एक परिपत्रक जारी करून चौकशी समिती गठीत करण्यात आली. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात औरंगाबाद व बीड जिल्ह्याला जोडणारा आपेगाव-कुरणपिंप्री हा पूल क्षतिग्रस्त झाला होता. हा पूल का कोसळला, त्याची दुरुस्ती कशी होऊ शकते, यापुढे अशा घटना होऊ नयेत म्हणून काय केले पाहिजे यावर ही समिती भाष्य करणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
अशी आहे समिती : अध्यक्ष- सी. पी. जोशी (मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, औरंगाबाद)
सदस्य- डॉ. डी. टी. ठुबे (अधीक्षक अभियंता, संकल्पचित्र मंडळ (पूल), कोकण भवन, मुंबई), व्ही. व्ही. कुलकर्णी (अधीक्षक अभियंता, दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, औरंगाबाद) आणि सदस्य सचिव-रामगुडे (कार्यकारी अभियंता, संकल्पचित्र विभाग, मुंबई)
समितीचे काम- पूल क्षतिग्रस्त होण्याची कारणे शोधणे, भविष्यातील बांधकामांमध्ये अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना सुचवणे आणि पुलाची दुरुस्ती करण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करणे.
कालावधी- शासनाचा जी. आर. जारी झाल्यापासून एक महिना.
अद्याप अहवाल येणे बाकी
यापूर्वी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने स्वतंत्र चौकशी केली होती. त्याचा अहवाल अजून प्राप्त व्हायचा आहे. मात्र, आता शासनानेच समिती नियुक्त केल्याने अंतिम कारवाई याच समितीच्या अहवालावरून होणार हे स्पष्ट झाले आहे.