आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाकी वर्दीची क्रेझ, तोतया डीवायएसपी सरिता कुलकर्णीला २ दिवस कोठडीची हवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - डीवायएसपी असल्याचे भासवून १४ दिवस परतूरच्या विश्रामगृहात मुक्काम ठोकलेल्या सरिता रामराव कुलकर्णी (बाणेगाव, ता. पूर्णा, जि. परभणी) हीस परतूर न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शनिवारी दुपारी परतूर पोलिसांनी तिला अटक केली होती. रविवारी न्यायालयापुढे हजर केले होते.

पोलिस व्हायचे, रुबाब दाखवायचा हे स्वप्न मनाशी बाळगून असलेल्या सरिताला खाकी वर्दीचे जबरदस्त आकर्षण राहिले आहे. यासाठी तिने औरंगाबाद येथील खासगी भरतीपूर्व पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले. मात्र, नशिबाने साथ न दिल्याने ती पोलिस होऊ शकली नाही.
पोलिस होता आले नाही म्हणून करिअरच्या अन्य वाटा शोधायच्या किंवा शांत बसायचं हे सरिताच्या स्वभावाला पटणारं नव्हत. दरम्यान, सरिताने औरंगाबादेतूनच पोलिसगिरीला प्रारंभ केला. पाहता- पाहता पोलिस कर्मचारी अन् पुढे थेट पीएसआय झाल्याचे सांगून तिने थापा मारणे सुरू केले. आपण करत असलेल्या बनवेगिरीतून काय बरेवाईट निष्पन्न होईल याची जराही तमा न बाळगता सरिता बिनधास्त पोलिस म्हणून शहरात वावरू लागली. कधी पोलिस शिपाई तर कधी पीएसआय अशा परस्पर पदोन्नतीच्या थापा मारल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर ही माहिती वरिष्ठ पोलिस अधिका-यांपर्यंत पोहोचली. चौकशीअंती हा बनाव असल्याचे लक्षात आल्यावर सरिताला पकडण्याचे फर्मान सोडण्यात आले. दरम्यान, सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ठाकरे यांनी पोलिस उपनिरीक्षक अभय चव्हाण यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. चव्हाण यांनी कर्मचारी सोबत घेऊन सापळा रचून पोलिस अधीक्षक कार्यालयातून सरिताला अटक केली. या प्रकरणी सिडकाे पोलिस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

पीएसआय नव्हे, डीवायएसपी
खाकीची क्रेझ असल्यामुळे सरिताने डीवायएसपी होण्याचा निश्चय केला व यासाठी परतूर उपविभागाची निवड केली. परतूर उपविभागाची जागा रिक्त असल्याने तिचा प्लॅनही अचूक ठरला. यासाठी तिने परतूरमधील विश्रामगृह गाठले व नवीन डीवायएसपी अाल्याची थाप मारून शहरात बातमी पेरली. दरम्यान, शहरात खोलीही किरायाने घेतली. स्टेट बॅँक आॅफ हैदराबाद शाखेत सुरक्षा रक्षक असलेल्या घरमालक प्रभाकर ढोबळे यांच्या ओळखीने उधारीवर १८ हजार २०० रुपयांचा फ्रिज घेतला. मात्र, हा फ्रिज खोलीवर न नेता अन्यत्र हलवण्याचा प्रयत्न केला आणि येथेच सरिताचा प्लॅन फसला. याबाबत ढोबळे यांनी तक्रार दिल्यानंतर परतूर पोलिसांनी तिला सापळा रचून अटक केली.

परिस्थिती बेताचीच
परभणी जिल्ह्यातील बाणेगाव या खेड्यातून आलेल्या सरिताची घरची परिस्थिती बेताचीच. शिकून मोठे व्हायचे हे सरिताचे स्वप्न. यासाठी तिने बारावीपर्यंत शिक्षणही घेतले. तसेच पोलिसच व्हायचे असा निश्चय केला. भरतीपूर्व प्रशिक्षण घेऊनही अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, एकदा आलेले अपयश पचवून पुन्हा संघर्ष करण्याऐवजी पळवाटा शोधण्यात सरिताने धन्यता मानली व दाेन वेळा पोलिसांच्या जाळ्यात अडकली.