आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोफत पुस्तक वितरणात गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक वाटप योजना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत लाभदायी आहे. मात्र, नियोजनाचा अभाव, ढिसाळ नियंत्रण यामुळे या योजनेचा पुरता फज्जा उडाल्याचा प्रत्यय कन्नड तालुक्यात येत आहे. शाळा सुरू होऊन 15 दिवस झाले तरी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाले नाहीत. काही शाळेत विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक पुस्तके तर काही शाळांत विद्यार्थी संख्येइतकी पुस्तके प्राप्त झालेली नाहीत.

शिक्षण विभागाने दिलेली मोफत पुस्तके खरे तर जिल्हा परिषद शाळा, खासगी अनुदानित, शासकीय आश्रमशाळा व खासगी अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहे. मात्र, या शाळांव्यतिरिक्त कायम विनाअनुदानित तसेच विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्य शाळांमध्येही पुस्तके आढळून येत आहेत. विद्यार्थी संख्या व पुस्तकांची संख्या यांची जुळवाजुळव करण्यात पंचायत समिती शिक्षण विभाग मग्न आहे, मात्र, त्याचा ताळमेळ लागत नाही.

शिक्षण विभाग केंद्रनिहाय पुस्तके वितरण केले असल्याचे सांगत आहे. तर केंद्रावरून शाळेपर्यंत विद्यार्थी संख्येनुसार पुस्तके मिळाली नाहीत. शिक्षण विभागाच्या कार्यालयानुसार वरिष्ठ कार्यालयाकडून केवळ पाचवीचे भूगोल तर चौथीचे परिसर अभ्यास भाग-1, या दोन विषयांची पुस्तके मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष शाळेवर भेट दिली असता बर्‍याच विषयांची पुस्तके प्राप्त झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

तालुक्यात इयत्ता पहिली ते पाचवी अनुदानित शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या 33,455 तर सहावी ते आठवीची एकूण विद्यार्थी संख्या 19,223 याप्रमाणे पहिली ते आठवीचे एकूण 52, 678 विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने कळवले आहे. मात्र, विद्यार्थ्यांना काही विषयांची पुस्तके आजही प्राप्त झालेली नाहीत.

दोषींवर योग्य ती कारवाई करणार
तालुक्यातील 20 केंद्राअंतर्गत येणार्‍या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके वाटपासाठी देण्यात आलेली आहेत. केंद्रप्रमुखामार्फत ती प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्रशाला, अनुदानित शाळा, आश्रम शाळांना वाटप करायची आहेत. जवळपास सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली आहे. मात्र, तरीही केंद्रस्तरावरून पाठ्यपुस्तके मिळाली नसल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. - ए. ए. लाटकर, गटशिक्षणाधिकारी, कन्नड