आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळातून विषबाधा की सर्पदंश? दोन चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर आई अत्यवस्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- रात्री झोपण्यापूर्वी सफरचंद चिकू खाल्ल्यानंतर मळमळ उलटी होऊन दोन बालकांचा मृत्यू आईही अत्यवस्थ झाल्याची घटना बीड तालुक्यातील गोलंग्री येथे बुधवारी पहाटे चार वाजता घडली. दरम्यान, फळातून विषबाधा झाल्याने मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला असला तरी सुरुवातीला सर्पदंशाची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. परंतु शेवटी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनाही मृत्यूचे कारण कळत नसल्याने दोन्ही मुलांच्या मृत्यूचे गूढ निर्माण झाले आहे. दरम्यान, मुलांच्या पोटातील अन्न नमुने पाणी नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. 

गोलंग्री (ता. बीड) येथील साखर कारखान्यावरील कामगार भारत शिंदे यांची मुले साई (२) ओम (५) यांना बुधवारी पहाटे राहत्या घरी मळमळ होऊन उलट्या झाल्या. काही वेळातच दोन्ही मुले अत्यवस्थ झाली. पाठोपाठ पत्नी प्राजक्तालाही अत्यवस्थ वाटू लागल्याने तिघांनाही सकाळी सहा वाजता उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात आेम याचा रुग्णालयात येताच मृत्यू झाला, तर साईचा सात तासांनंतर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

भारत यांना दोनच मुले होती. दोन्ही मुलांच्या मृत्यूने त्यांच्यावर एकीकडे दु:खाचा डोंगर कोसळला असताना दुसरीकडे अतिदक्षता विभागात पत्नीची तब्येत खालावत असल्याची चिंता आहे. दुपारपर्यंत मुलांच्या मृत्यूची बातमी प्राजक्ता यांना कळवण्यात आली नव्हती. पण दुपारी साईच्या मृत्यूनंतर ही बातमी त्यांना सांगण्यात आल्यावर त्यांच्यासह इतर नातेवाइकांनी सकाळपासून रोखलेल्या दु:खावेगाला वाट मोकळी केली. त्यांच्या आक्रोशाने रुग्णालय परिसरही सुन्न झाला होता. प्रत्येकाला ही घटना कळल्यानंतर तो हळहळ व्यक्त करत होता. 

शिंदे कुटुंबीयांनी मुलांनी खालेल्ली फळे अशी टोपलीत घालून जिल्हा रुग्णालयात आणली होती 
साई, ओम यांनी फळांचा हट्ट केल्यानंतर भारत शिंदे यांनी चौसाळा गावातून मंगळवारी सायंकाळी सफरचंद, चिकू अशी फळे आणली होती. हीच फळे खाऊन मुले झोपली होती. त्यामुळे फळांमधूनच त्यांना विषबाधा झाल्याचा दावा करून शिंदे यांनी मुलांना खाण्यासाठी आणलेली फळे रुग्णालयात आणली होती. 
 
विषबाधा कशातून? डॉक्टरही झालेत थक्क 
ओमआणि साई या दोन बालकांचा मृत्यू विषबाधेने झाला असला तरी त्यांना नेमकी विषबाधा कशातून झाली हेच कळालेले नाही. फळांतून विषबाधा होऊन इतक्या पटकन त्यांचा मृत्यू होऊ शकतो का यावर डॉक्टरही बुचकळ्यात पडलेले अाहेत. झोपेत सर्पदंश झाल्याचा अंदाज सुरुवातीला होता, परंतु त्यांच्या अंगावर कुठेही दंशाचे व्रण नव्हते. एकाच वेळी तिघांनाही दंश कसा होऊ शकेल? ओम हा पलंगावर, तर साई जमिनीवर झोपलेला होता. त्यामुळे दोघांनाही दंश होऊ शकेल का, अशा शंका डॉक्टरांना आहेत. शिवाय सर्पदंशाची प्राथमिक लक्षणेही दिसून येत नसल्याने नेमकी विषबाधा कशातून झाली आणि मृत्यूचे नेमके कारण काय हे स्पष्ट झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण म्हणाले. 

पोटातील नमुन्यांची तपासणी 
मृत्यूचे कारण कळण्यासाठी मुलांच्या पोटातील अन्न नमुने पाणी नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालानंतर विषबाधा कशा प्रकारची होती हे समोर येणार आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरही काही बाबी समोर येऊ शकतील. त्यामुळे आता यासंदर्भात सांगणे उचित ठरणार नाही. 
- डॉ. नागेश चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड 

फळांचे नमुने घेणार 
फळांतून विषबाधा झाल्याचे शिंदे कुटुंबीयांचे म्हणणे असल्याने याबाबत तपासणी करण्यात येणार आहे. मुलांनी खाल्लेल्या फळांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येतील. ज्यांच्याकडून फळे खरेदी केली त्या व्यापाऱ्यांकडील फळांचे नमुने घेऊ. सहायक आयुक्तांनी आरोग्य विभागाशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपणास सर्व बाबीसमोर येतील. 
- सुलक्षणा जाधवर, अन्न सुरक्षा अधिकारी, बीड 
बातम्या आणखी आहेत...