आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येळगंगा नदीच्या कामासाठी "जलयुक्त'मधून निधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या वेरूळ येथील येळगंगा नदीची साफसफाई, रुंदीकरण, खोलीकरण आदी कामे सुरू आहेत. मात्र, घृष्णेश्वर मंदिराजवळील शेतकर्‍यांनी थांबवलेले काम तसेच जलयुक्त शिवार अभियानातून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, यासंदर्भात १० एप्रिल रोजी "निधीअभावी संथ गतीने काम' हे वृत्त शुक्रवारी ‘दिव्य मराठी’त प्रकाशित झाले. त्याची दखल घेत तहसीलदार सचिन घागरे यांनी तलाठी लक्ष्मण जाधव व मंडळ अधिकारी शेखर शिंदे यांच्यासह येळगंगा परिसरात पाहणी केली. रखडलेले काम त्वरित करून घेण्यासह जलयुक्त अभियानाअंतर्गत यंत्राकरिता इंधन उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तसेच नदीपात्राच्या विकासकामासाठी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र बँकेचे मुख्य प्रबंधक बी. एस. गिऱ्हे यांनीही नदीपात्राची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी समाधान व्यक्त करत आणखी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. गटविकास अधिकारी विठ्ठल हरकळ, ग्रामसेवक बी. आर. म्हस्के, उद्योजक निश्चल शेंडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष फुलारे, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश हजारी, माजी नगराध्यक्ष हाजी अकबर बेग उपस्थित होते.

संपूर्ण नदीचे मोजमाप करणार
या नदीच्या विकासासाठी लोकसहभाग पाहता सहकार्य म्हणून वेरूळ लेणी ते माटेगाव धरण असा आम्ही सर्व्हे करणार आहोत. जेणेकरून विकासकामात अडचण येणार नाही. - चंद्रशेखर बर्दापूरकर, अभियंता

सोमवारपर्यंत सर्व प्रश्न सोडवू
शेतकर्‍यांनी अडवलेल्या कामाची पाहणी केली असून काम थांबवणे चुकीचे आहे. जलयुक्त शिवार अभियानातून इंधन देण्याविषयी वरिष्ठांशी चर्चा करून सोमवारपर्यंत दोन्ही प्रश्न मार्गी लावू.
सचिन घागरे, तहसीलदार