आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅड. एकनाथ आव्हाड यांना अखेरचा निरोप, तेलगाव येथे झाले अंत्यसंस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - दलित चळवळीचे ज्येष्ठ नेते व मानवी हक्क अभियानाचे अध्यक्ष अॅड. एकनाथ आव्हाड यांना हजारोंच्या जनसमुदायाने मंगळवारी शोकाकुल वातावरणात अखेरचा निराेप दिला. धारूर तालुक्यातील तेलगाव येथील नेल्सन मंडेला वसाहतीसमोर बौद्ध धम्म पद्धतीने आव्हाड यांच्या पार्थिवावर सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

हैदराबाद येथे खासगी रुग्णालयात सोमवारी सकाळी आठ वाजता उपचारादरम्यान अॅड. एकनाथ आव्हाड यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव हैदराबादहून रुग्णवाहिकेने रात्री आठ वाजता धारूर येथे आणण्यात आले. धारूरच्या शिवाजी चौकात अर्धा तास पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर रात्री दहा वाजता आव्हाड यांचे जन्मगाव असलेल्या वडवणी तालुक्यातील दुकडेगाव येथे त्यांच्या जुन्या राहत्या घरी नेण्यात आले. रात्री अकरा वाजता पार्थिव तेलगाव येथील ग्रामीण विकास कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंत्यसंस्कारास विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार विवेक पंडित, आमदार जयदेव गायकवाड, आर. टी. देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, जोगेंद्र कवाडे, लक्ष्मण माने, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, पृथ्वीराज साठे, बाबूराव पोटभरे, नगराध्यक्ष अविनाश जावळे, पप्पू कागदे, विजय साळवे, गौतम भालेराव, मनीषा तोकले, प्रा. सुशीला मोराळे, विश्वनाथ तोडकर, रवींद्र क्षीरसागर आदी उपस्थित होते.

कुुटुंबाने दिला अग्निडाग
तेलगाव येथील त्यांच्या ग्रामीण विकास कार्यालयासमोरील प्रांगणात अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. आव्हाड यांच्या निधनाचे वृत्त कळताच महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या चळवळीतील पदाधिकारी व महिलांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. सकाळी साडेदहा वाजता अंत्यदर्शनासाठी रांगा लावल्या. सकाळी अकरा वाजता पार्थिवावर १२ भिक्खूंच्या उपस्थितीत बौद्ध धम्म पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा मिलिंद, मुलगी शालन, सुरेखा व पत्नी गयाबाई यांनी अग्निडाग दिला.

तेलगावात बंद
तेलगाव येथे अॅड. अाव्हाड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली.

उस्मानाबादेत श्रद्धांजली
उस्मानाबाद | येथे महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने अॅड. एकनाथ आव्हाड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बापू शिंदे होते. या वेळी अॅड. आव्हाड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बैठकीत अतिरिक्त महासचिव हरिभाऊ बनसोडे यांनी भाषण केले.