आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काकासाहेब दांडेकर अमर रहेच्या घोषणा..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हतनूर (ता. कन्नड) - कन्नड तालुक्यातील निमडोंगरी येथील काकासाहेब बाबूराव दांडेकर (४५) यांचे गुरुवार, ८ रोजी सिक्कीमजवळील लाचुंग येथे सुभेदार पदावर कार्यरत असताना निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवार, ११ रोजी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुभेदार काकासाहेब दांडेकर हे २६ वर्षांपासून मराठा इन्फंट्रीमध्ये (मराठा बटालियन २६) कार्यरत होते. गुरुवारी अचानक त्यांचे निधन झाल्याची बातमी मराठा बटालियनने दांडेकर यांच्या कुटुंबीयांना कळविली होती. ही माहिती मिळताच निमडोंगरीवर शोककळा पसरली व कन्नडसह तालुकाभर हळहळ व्यक्त करण्यात आली. ३१ मार्च २०१७ मध्ये ते सेवानिवृत्त होणार होते.

दांडेकर यांचे पार्थिव लष्करी विमानाने शनिवारी सायंकाळी औरंगाबाद येथे व नंतर लष्करी तळावरून निमडोंगरी येथे रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास आणण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, कन्नड उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, तहसीलदार विनोद गुंडमवार आणि पोलिस उपनिरीक्षक रोहित बेमरे यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून सलामी दिली.

काकासाहेब दांडेकर यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यापूर्वी २२ मेडियम रेजिमेंट बटालियनचे सुभेदार सतीश पाहुणे, हवालदार राजाराम चौगुले औरंगाबाद लष्करातील सुभेदार मेजर रिटायर हनुमंत गायकवाड, सुभेदार चंद्रकांत देवकर, सुभेदार उपेंद्रसिंग, हवालदार संजय पिसे यांनी तीन फैरी झाडून सलामी दिली. पोलिस हेडकॉन्स्टेबल एस. बी. चव्हाण, पोलिस नाईक जी. बी. जैन, पोलिस नाईक एस. डी. शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल जे. डी. चव्हाण यांनीही तीन वेळा हवेत गोळीबार करून पार्थिवास सलामी दिली.

या अंत्यविधीस पंचक्रोशीतील नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी, राजकीय पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी, दोन भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे.
बातम्या आणखी आहेत...