आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवला पुनर्वसन गावाच्या स्मशानभूमीचा प्रश्न पेटला; सेलू तहसील प्रवेशद्वारावरच अंत्यसंस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलू- परभणीच्या सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पाच्या पुनर्वसितांचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुनर्वसन होऊन अनेक वर्षे लोटूनही स्मशानभूमीची सुविधा नसल्याने बुधवारी चक्क सेलू तहसील कार्यालयासमाेर ग्रामस्थांनी अंत्यसंस्कार केल्याने खळबळ उडाली. 

लोअर दुधना प्रकल्पाच्या उभारणीमुळे सातोना रोडवर पुनर्वसित देवला गावातील आश्रोबा दगडोबा पंढुरे (७०) यांचे मंगळवारी निधन झाले. मात्र गावात स्मशानभूमीच नसल्याने अंत्यसंस्कार कुठे करायचा, हा नातेवाइकांना प्रश्न पडला. त्यांनी बुधवारी सकाळी महसूल प्रशासनाशी संपर्क केला. दरम्यान, नातेवाइकांनी सेलू तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मृतदेह आणून ठेवला. येथेच अंत्यसंस्कार होणार असल्याचे कळताच तहसीलदारांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, भूमी अधिग्रहण व भूसंपादन संस्था, पोलिस अधिकारी व लोकप्रतिनिधींसाेबत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. 

नवीन प्रस्ताव तयार करणार : तहसीलदार
तहसीलदार स्वरूप कंकाळ म्हणाले, देवला पुनर्वसन येथे स्मशानभूमीसाठी गट क्र. २३५ मध्ये जागा अधिग्रहित केली होती. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले होते. आयुक्त कार्यालयाने हा गट नंबर अधिग्रहणातून वगळलेला असल्याने आज त्या जागेवर कुठलाच निर्णय घेता येत नाही. म्हणून स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्यासाठी जमीन अधिग्रहणाचा नवीन प्रस्ताव तयार करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...