आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोडमध्ये गाळ उपशावरून वादावादी; प्रशासनाचे दुर्लक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड- रजाळवाडी तलाव परिसरात शेतजमिनी असलेल्या शेतकर्‍यांनी प्रकल्पातील गाळ उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याने जमिनीचा पोत खराब होण्याच्या भीतीने विरोध केला आहे. दरम्यान, प्रशासनाचेही याकडे लक्ष नसल्याने ट्रॅक्टरचालक व शेतकर्‍यांमध्ये वादावादी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. मात्र, प्रशासन केवळ गाळ उपसा करून शेतकर्‍यांनी घेऊन जावा, असे आवाहन करून मोकळे झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.
तालुक्यातील पाझर तलाव कोरडे पडल्यानंतर मार्च महिन्यापासून तलावामधून गाळ उपसा करण्यास शेतकर्‍यांनी सुरुवात केली होती. पाणीटंचाई व रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी जानेवारी महिन्यापासून घेण्यात आलेल्या बैठकांमधून गाळ उपसा करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत होते.

सुरुवातीला शासनाकडे उपलब्ध यंत्रसामग्रीच्या साहाय्याने गाळ काढून देण्यात येईल, शेतकर्‍यांनी स्वखर्चाने घेऊन जावा, असे तत्कालीन जिल्हाधिकारी कुणालकुमार यांनी सांगितले होते. आमदार अब्दुल सत्तार यांनीही अशाच प्रकारचे आवाहन केले होते, परंतु प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली नाही. शेतकर्‍यांनी स्वखर्चाने खेळणा मध्यम प्रकल्पातून जवळपास ऐंशी हजार ब्रास गाळ उपसा केला. त्यानंतर तालुक्यातील अन्य तलावांमधूनही गाळ उपसा करण्यात आला. गेल्या महिनाभरापासून सिल्लोड शहरालगत असलेल्या रजाळवाडी तलावातून गाळ उपसा सुरू आहे.

या तलावापासून साधारणपणे दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील शेतांमध्ये गाळ वाहतूक करण्यात येते. दोन पोकलेन व चार जेसीबी काम करीत असून दररोज पाचशे ट्रॅक्टर गाळ वाहतूक करतात. एक ट्रॅक्टर दिवसाकाठी सरासरी सहा ट्रीप वाहतूक करीत असल्याने दररोज तीन हजार ब्रास वाहतूक केली जाते. महिनाभरात जवळपास एक लाख ब्रास गाळ उपसा करण्यात आला. या माध्यमातून दरदिवशी नऊ ते दहा लाख रुपयांची उलाढाल सुरू असून मंदीच्या काळात रोजगार निर्मिती झाली आहे. गाळ उपशामुळे ट्रॅक्टरला मोठा व्यवसाय मिळाला.

रजाळवाडी तलावातील पाण्यामुळे सिल्लोड शहरातील बहुतांश हातपंपांना पाणी असते. तलावातील पाणी संपले की हातपंपाचेही पाणी संपते. गाळ उपसा सुरू असल्याने साठवण क्षमता असणार्‍या तलावाची सरासरी दहा ते पंधरा फूट खोली वाढली आहे.

शेतकर्‍यांचा विरोध व प्रशासनाचे दुर्लक्ष : तलावाच्या मध्यातील गाळ संपल्याने अन्य क्षेत्रातील उपसा करण्यास परिसरातील शेतकरी विरोध करीत आहेत. जमीन आमची असल्याने येथील गाळ नेऊ न देण्याची भूमिका आहे. यावरून वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.

> रजाळवाडी तलावाच्या गाळ उपशासंदर्भात अद्याप तक्रार आलेली नाही. अडचणी असल्यास सोडवण्यात येतील.
आर. वाय. कुलकर्णी, नायब तहसीलदार

>परिसरातील शेतकर्‍यांनी गाळ वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर दगडफेक सुरू केली आहे. त्यामुळे दहशतीचे वातावरण आहे.
मुजाहिद पठाण, टॅक्टरचालक, के-हाळा

>गाळ उपसा सुरू असलेल्या ठिकाणी प्रशासनाचे लक्ष नसून तेथे जाऊन परिस्थिती पाहण्याची अधिकार्‍यांची तयारी नाही. आमच्या जमिनीतील गाळ आम्ही घेऊन जाऊ देणार नाही.
शिवाजी, रमेश, कृष्णा, सुधाकर कुदळ, स्थानिक शेतकरी