पैठण- मोबाइलद्वारे संपर्कात आलेल्या अकोला जिल्ह्यातील २५ वर्षीय अपंग युवतीवर आळीपाळीने अत्याचार करणाऱ्या चारपैकी तीन जणांना पैठण पोलिसांनी शेवगाव परिसरातून बुधवारी सकाळी अटक केली. शेख असलम (२०, रा. दहिफळ, ता. शेवगाव, जि. अहमदनगर ), शेख शाबुद्दीन अलीम शेख (१९, रा. अहमदनगर ), योगेश मधुकर कथे (३४, रा. दहिफळ, ता. शेवगाव, जि. अहमदनगर ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून एक जण फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्याची रहिवासी असलेल्या २५ वर्षीय अपंग युवतीला पैठण येथे बोलावून ितच्यावर चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली होती. याप्रकरणी पीडित युवतीच्या तक्रारीवरून पैठण पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पीडित मुलीची मोबाइलवरून ओळख झाली होती. त्यामुळे दोन महिन्यांपासून या युवतीला ते पैठण येथे बोलवत होते.