आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाला यश; गंगापूर, वैजापूरला मिळणार ‘नांमका’चे पाणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर- पाणीटंचाईच्या गंभीर संकटात सापडलेल्या वैजापूर, गंगापूरला पिण्यासाठी दारणा जलसमूहातून नांदूर-मधमेश्वर जलद कालव्यात 850 दशलक्ष घनफूट पाणी आवर्तन सोडण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी दुपारी मान्यता दिली.

नाशिक व औरंगाबादचे विभागीय आयुक्त संयुक्तपणे दोन्ही तालुक्यांना पिण्यासाठी कालव्यातून पाणीवाटपाचे वेळापत्रक तयार करून पाणी देण्याच्या कार्यवाहीची तारीख त्यांच्या स्तरावर निश्चित करतील, असे धोरण ठरले आहे. वैजापूर-गंगापूरमधील 69 गावांना पिण्यासाठी पाणी 12 मार्चला नांदूर-मधमेश्वर कालव्यात सोडण्याचा आदेश जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी पाटबंधारे विभागाला दिला होता.

तथापि, नाशिक पाटबंधारे विभागाने दारणा समूहात वैजापूर, गंगापूर पाण्याचे आरक्षण नसल्यामुळे नांदूर-मधमेश्वर कालव्यात पाणी सोडता येणार नाही, अशी विरोधाची भूमिका घेतली होती. दरम्यान, पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतक-या ंनी नियोजनाप्रमाणे 12 मार्चला कालव्यात पाणी न सुटल्यामुळे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगताप, भाजप तालुकाध्यक्ष संभाजी कलापुरे, पाटपाणी संघर्ष समितीचे हरिभाऊ परदेशी यांच्या नेतृत्वाखाली शेतक-या ंचा मोठा जमाव नाशिक जिल्ह्यातील नांदूर-मधमेश्वर पिकअप वेअर धरणावर धडकला होता. त्या वेळी कोपरगावच्या गोदावरी डाव्या कालव्यातून पाणी वाहत होते. नांदूर-मधमेश्वर जलद कालवा पाण्याअभावी कोरडाठाक असल्याचे पाहून संतप्त झालेल्यांनी धरणाचे गेट तोडून कालव्याचे पाणी सोडण्याची भूमिका घेतली होती. या प्रकरणी 84 शेतक-यांवर निफाड पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.

पोलिस बंदोबस्तात पाणी सोडा - नांमकातून येणा-या पाण्याची दोन्ही तालुक्यांतील नागरिक चातकाप्रमाणे वाट पाहत असून गैरप्रकार होऊ नये व गंगापूर तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेऊन पोलिस बंदोबस्तात पाणी सोडावे, अशी मागणी किरण पाटील डोणगावकर यांनी केली आहे.
पाणी सोडण्याचे वेळापत्रक : 25 तारखेला दारणा धरणातून हे पाणी सोडण्यात येणार असून 27 तारखेपर्यंत नांदूर मधमेश्वरच्या पिकअप वेअरमध्ये पाणी येऊन धरणामध्ये पाण्याची निर्धारित पातळी आल्यानंतर त्याच दिवशी कालव्यात सोडण्यात येणार असून 28 मार्चच्या दुपारपर्यंत हे पाणी गंगापूर तालुक्यापर्यंत पोहोचेल, असे नियोजन नांमका प्रशासनाने केले आहे.

पदाधिका-यांची धावपळ- शासनाकडून नांदूर-मधमेश्वर कालव्यात पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब थोरात, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. प्रमोद जगताप, जिल्हा काँगे्रसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगताप असे पदाधिकारी मंगळवारपासून मुंबईत तळ ठोकून होते.