आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांची तलाठ्याकडून होतेय लूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - चिरीमिरी न दिल्यामुळे तलाठ्याने तहसील प्रशासनाच्या यादीत फेरफार करून गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना अनुदानापासून वंचित ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. तुळजापूर तालुक्यातील वडगाव (देव) येथील शेतकर्‍यांना तहसील प्रशासनाच्या यादीत नियमानुसार अनुदान मिळाले आहे. मात्र, तलाठ्याने पैसे उकळण्यासाठी दुसरी यादी तयार करून शेतकर्‍यांची लूट सुरू केली आहे.

गारपीटीत नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या याद्या तहसील प्रशासनाने तयार केल्या आहेत. त्याप्रमाणे शेतकर्‍यांना अनुदान वितरीत केले आहे. अनुदानासह याद्याही तहसील प्रशासनाने तलाठ्यांकडे वितरीत केल्या आहेत. मात्र, काही तलाठ्यांनी पैसे उकळण्यासाठी तहसील प्रशासनाच्या यादीत बदल केला आहे. ज्या शेतकर्‍यांना तहसील प्रशासनाच्या यादीत 25 हजार रुपये अनुदान मिळाले आहे, त्या शेतकर्‍याला तलाठ्याकडून बनावट यादीत 2 हजार रुपये अनुदान मिळाल्याचे दाखवले जाते. शेतकर्‍याला अनुदान मिळवून देण्यासाठी तीन ते चार हजार रुपयांची मागणी केली जाते. तुळजापूर तालुक्यातील वडगाव (देव) येथील उमाकांत हिंदराज पाटील (रा. वडगाव देव, ता. तुळजापूर) या शेतकर्‍याला तहसील प्रशासनाच्या यादीनुसार फळबागाच्या नुकसानीचे 25 हजार व इतर क्षेत्राच्या नुकसानीसाठी 2 हजार असे एकूण 27 हजार रुपये मिळाले आहेत. मात्र, तेथील तलाठी डी. एस. मेतलवाड यांनी अनुदानाच्या यादीत बदल करून 27 हजार रुपयांऐवजी 2 हजार रुपये अनुदान दाखविले आहे. तसेच तुम्हाला अनुदान वाढविण्यासाठी मी प्रयत्न करतो, यासाठी तीन हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले आहे. याचप्रमाणे अंबुबाई गोटे, काशिनाथ गोटे, अप्पय्या व अमित शांतय्या स्वामी, इंदुबाई देवकते, कस्तुरबाई जवळगे यासह इतर अनेक वडगाव (देव) येथील शेतकर्‍यांच्या अनुदानात व क्षेत्रात बदल करून पैशासाठी शेतकर्‍यांना वेठीस धरले आहे. शासनाने 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या 1 लाख 76 हजार 334.29 हेक्टरवरील 3 लाख 12 हजार 855 शेतकर्‍यांना मदत जाहीर केली. हे अनुदान शेतकर्‍यांना अद्याप मिळाले नाही. यासाठी शेतकर्‍यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.
सर्व तलाठ्यांना गारपिटीतील शेतकर्‍यांच्या अद्ययावत याद्या ग्रामपंचायतीत डकवण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोणी गैरकारभार केला असेल तर शहानिशा करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.’’
काशिनाथ पाटील, तहसीलदार, तुळजापूर.
शेतकर्‍यांचे अनुदानामुळे भावा- भावात भांडण आहे. त्यामुळे विनाकरण माझ्यावर आरोप करीत आहेत. यादी चुकीची असेल तर दुरुस्त करून घेतली जाईल.’’
डी. एस. मेतलवाड, तलाठी, वडगाव (देव).
गेल्यावेळेस ज्या शेतकर्‍यांनी अनुदान मिळाल्यानंतर तलाठ्याला पैसे दिले नाहीत, त्या शेतकर्‍यांना यावेळेस अनुदान मिळाले नसल्याचे तलाठी सांगत आहेत. तसेच अनुदान वाढवून देण्यासाठी पैशाची मागणी करतात.’’
उमाकांत पाटील, शेतकरी, वडगाव (देव).