आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gas Leak In Keshegaon Factory Osmanbad Latest Marathi News

केशेगाव कारखान्यात गॅस गळती, दोन कामगारांचा मृत्यू, तीन गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- तालुक्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्यातील दोन कामगारांचा प्रोसेसिंग टँकमध्ये गुदमरून मृत्यू झाला, तर तीन कामगारांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार मंगळवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडला.

डॉ. आंबेडकर साखर कारखान्याचे गाळप सध्या बंद आहे. या कालावधीत कारखान्याची साफसफाई, उपकरणांंची देखभाल, यंत्रांची दुरुस्ती, डागडुजी करण्याचे काम करण्यात येत आहे. यासाठी कारखान्यात कामगार कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळपासून उत्पादन विभागात देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. येथील पाक तयार करण्याच्या व्हेपरसेल बॉडी प्रोसेसिंग टँकची दुरुस्ती सुरू हाेती. या टँकमध्ये उसाच्या रसापासून तयार झालेल्या पाकावर प्रक्रिया करण्यात येते.

टँकच्या आतील बाजूने प्रोटेक्टिव्ह कलर (संरक्षक रंग) देण्याचे काम सुरू होते. याचे काम पाच जणांवर सोपवण्यात आले हाेते. रंग देत असतानाच अचानक विषारी गॅस निर्माण होणे सुरू झाले. टाकीत रंग देण्यासाठी उतरलेले हेल्पर सागर भगवान बरडे (२५, रा. बेंबळी, ता. उस्मानाबाद) पॅनमेल असिस्टंट नवनाथ नागाेराव सपाटे (३५, रा. केशेगाव) दोघे गॅसच्या प्रभावामुळे टाकीत बेशुद्ध पडले. यामुळे तातडीने बाहेर पडता आले नाही. त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर अरुण इंगळे (३१, कनगरा, ता. उस्मानाबाद), शफिक खान महंमद पठाण (५५) अहमद शौकत शहा (३५, रा. बेंबळी) ही तिघे कामगारही गॅसमुळे अत्यवस्थ झाले. पाचही जणांना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी आणण्यात आले. मात्र, येथे आणल्यानंतर बरडे सपाटे यांचा मृत्यू झाला. अन्य तिघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे नातेवाइकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृतीही गंभीर, परंतु धोक्याच्या बाहेर आहे. त्यांच्यावर डॉक्टर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अशी घडली घटना
सुरुवातीलाइंगळे रंग देण्यासाठी टँकमध्ये होते. गॅसची निर्मिती झाल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी बरडे सपाटे टँकमध्ये उतरले. दोघांनाही गॅसचा प्रभाव सहन झाला नसल्यामुळे ते काही वेळातच बेशुद्ध पडले. हे पाहून पठाण शहा यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही गॅसची तीव्रता सहन झाली नाही. गोंधळाची परिस्थिती पाहून अन्य विभागांतील अनेक कामगार तेथे आले. पंखे सुरू करून गॅस टँकमधून बाहेर काढण्यात आला. कामगारांनी टाकीची काच फोडून पाचही जणांना बाहेर काढले.