आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किनगावात 300 ग्रामस्थांना गॅस्ट्रोसदृश आजाराने ग्रासले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री - तालुक्यातील किनगाव येथे तीन दिवसांपासून 300 ग्रामस्थांना ताप, उलट्या, डोकेदुखी, पोटदुखी, मळमळ, उलट्यांसह गॅस्ट्रोसदृश आजाराने ग्रासले आहे. आरोग्य विभागाच्या संपामुळे या रुग्णांना मिळेल त्या खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहेत. दूषित पाण्यामुळे हा प्रकार घडून येत असावा, असा अंदाज नागरिक व्यक्त करत आहेत.

किनगाव येथे दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे तीन ते चार दिवसांपासून शेकडो ग्रामस्थांना डोकेदुखी, पोटदुखी, उलट्या, ताप येणे, संडास लागणे व मळमळ होणे आदी प्रकारांनी ग्रासले आहे. त्यात आरोग्य विभागाचे डॉक्टर संपावर आहेत. त्यामुळे किनगाव येथील प्राथमिक उपकेंद्रात एक परिचारिका रुग्णाला चार गोळ्या देऊन आपले कर्तव्य बजावत आहे. मात्र, रुग्णांना आराम मिळत नसल्यामुळे डॉक्टराअभावी पुन्हा खासगी दवाखान्याकडे वळावे लागत आहे. परिणामी आर्थिक परिस्थिती नाजूक असणार्‍यांना भुर्दंड सहन करावा लागत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

किनगावातील शंकर चव्हाण, सुभाष शिरोडकर, काशीनाथ मगरे, दक्षता गोरे, दिनेश नजन, अशोक देवकर, दीपक चव्हाण, नंदाबाई मेने, अजिनाथ चव्हाण, भाऊसाहेब संकपाळ, योगेश संकपाळ, भाऊसाहेब सोनवणे, लक्ष्मण पवार, राजेंद्र चव्हाण, अश्विनी चव्हाण आदींना आजाराची लागण झाली आहे.