आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहानलेल्या लातूरकरांच्या मदतीला जर्मनी धावली, भूजलाचा शोध घेऊन घेणार बोअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- अक्षांश - रेखांशाच्या साहाय्याने भूजलाचा शोध घेऊन तहानलेल्या जनतेला बोअरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जर्मन वैज्ञानिकांचे पथक जिल्ह्यात पाठवले आहे. शनिवारी या पथकाने देवणी तालुक्यातील वलांडी येथील जागेची पाहणी केली त्यांनी सुचवलेल्या जागेवर बोअर घेतला असता अवघ्या ९० फुटांवरच पाण्याचे फवारे उसळले. पहिलाच प्रयोग सफल झाल्याने गावकरी आनंदले. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्याची लहर वैज्ञानिकांनाही सुखावून गेली. आता हा प्रयोग जिल्हाभर राबवण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई हे शासन-प्रशासनासाठी आव्हान ठरले आहे. त्याच्या निवारणासाठी ते विविध उपाययोजना करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा प्रयोग करण्यात येत आहे. जर्मनी येथील क्वान्टम वॉटर टेक्नॉलॉजी या कंपनीने भूजलाचा शोध घेण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. जगात या तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. यानुसार कंपनीचे वैज्ञानिक गुगल मॅपच्या जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे जागेच्या अक्षांश-रेखांशाची माहिती घेतात ती इंटरनेटद्वारे कंपनीच्या प्रयोगशाळेत पाठवतात. या माहितीचे प्रयोगशाळेत परीक्षण केले जाते. परीक्षण केलेल्या जागेच्या दहा मीटर परिसरात पाणी उपलब्ध आहे याची खात्री करण्यात येते. लॅबचे तज्ज्ञ पुन्हा वैज्ञानिकांना ही माहिती पाठवतात. त्याअाधारे वैज्ञानिक संबंधित जागेचे छायाचित्र काढून पुन्हा ते रिसर्च लॅबकडे पाठवतात. ज्या ठिकाणी पाण्याचा स्रोत आहे. त्या जागेच्या अक्षांश-रेखांशाची माहिती लॅबकरवी या टीमला पाठवण्यात येते सुचवलेल्या जागेवर बोअर घेण्यात येते. वलांडी येथील प्रयोगात डॉ. लॅम्बर्ट, डॉ. तोलिया यांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्री कार्यालयाचे संजय पांडे, लातूरचे भूवैज्ञानिक एम. एस. शेख आदींची उपस्थिती होती.

क्वान्टम वॉटर टेक्नॉलॉजी कंपनीच्या या तंत्रज्ञानाद्वारे राज्यात घेण्यात आलेल्या सर्वच बोअरना पाणी लागले आहे. तहानलेल्या लातूर जिल्ह्यात हा प्रयोग करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सुचवले. त्यानुसार बोअर घेण्यात येत आहेत. - एम. एस. शेख, वरिष्ठभूवैज्ञानिक