आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Beaten With Friends After Asking Caste In Latur District

मित्रासोबत फिरायला गेलेल्या मुलीला जात विचारून मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : बालाजी गोडसे मुख्य आरोपी
लातूर - लातूरजवळील अंकोली गावात मित्रासोबत फिरायला गेलेल्या मुलीला तिची जात विचारून 'गनिमीकावा' संघटनेचा जिल्हाध्यक्ष बालाजी गोडसे पाटील याने पाच साथीदारांसह अमानुष मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मारहाण करतानाच त्यांनी मोबाइलद्वारे याचे चित्रीकरण केले आणि ते व्हॉट्सअॅपवर टाकले. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात घडलेला हा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला. दरम्यान, पोलिसांनी यातील तिघांना अटक केली असून तिघे फरार झाले आहेत.

व्हॉट्सअॅपवर फिरत असलेल्या व्हिडिओत चार ते पाच जण एका कॉलेजवयीन मुला-मुलीला मारहाण करीत असल्याचे दिसते. पांढरे कपडे घातलेला एक जण या दोघांकडे ओळखपत्राची मागणी करतोय, तर मुलगा-मुलगी आमची चूक झाली असून आम्हाला सोडून द्या, अशी विनवणी करीत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पांढ-या शर्टातील तुझी जात कोणती आहे, असे विचारत मुलीला बेदम मारहाण करीत असल्याचे स्पष्ट दिसते. तिने जात सांगितल्यावर तर तिला आणखी मारहाण करण्यात आली. त्याचदरम्यान त्यांच्यातील एकाने हा प्रकार मोबाइलवर चित्रित केला आणि पुढे तो व्हॉट्सअॅपवर टाकला. दरम्यान, गुरुवारी हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी पथके तयार करून तपास केला. तेव्हा हा प्रकार ३० ऑक्टोबर २०१४ रोजी लातूरजवळ अंकोली गावाशेजारी घडल्याचे उघड झाले.

कलमांबाबत संशय
दरम्यान, या प्रकरणाची गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी दखल घेतल्यानंतर पोलिसांनी सहा आरोपींवर दरोडा टाकणे, लूट करणे आणि व्हिडिओ चित्रित करून व्हॉट्सअॅपवर टाकणे असा गुन्हा नोंदवला आहे. मात्र, मुलीला मारहाण केल्याप्रकरणी तिचा विनयभंग करण्याचा गुन्हा दाखल केलेला नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी शांतताभंग करणे, कायदा हातात घेणे या गुन्ह्याखाली कलमे दाखल केलेली नाहीत. त्यामुळे पोलिस आरोपींचे संरक्षण करीत आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्हाध्यक्ष निलंबित
लातूरच्या दयानंद महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या सत्यशील सावंत यांनी गनिमीकावा संघटनेची दोन वर्षांपूर्वी स्थापना केली. छावामधून बाहेर पडलेले लक्ष्मीकांत जोगदंड या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता, मुलीला मारहाण केल्याचे समर्थन होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. घडलेला प्रकार चुकीचा असून त्याबाबत या प्रकरणातील आरोपी तथा संघटनेचा जिल्हाध्यक्ष बालाजी गोडसे याला निलंबित करीत असल्याचे जोगदंड यांनी सांगितले.

यापूर्वीही झाले होते प्रकार
लातूरमध्ये यापूर्वीही असे प्रकार झाले होते. दोन वर्षांपूर्वी कातपूर तलावाकडे फिरायला गेलेल्या जोडप्याला पकडून मुलाला मारहाण करण्यात आली आणि मुलीवर बलात्कार झाला. आठच दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा मोबाइलवर व्हिडिओ काढून तो पसरवण्यात आल्यानंतर तिने जाळून घेतले. ती सध्या मृत्यूशी झुंजत आहे.

पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच
व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी स्वत: होऊन कारवाई केली आहे. जी कलमे लावली आहेत ती योग्यच आहेत. त्याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. तिघांना अटक केली असून इतर तिघांनाही लवकरच पकडले जाईल. मुलीची बदनामी होऊ नये म्हणून इतर कलमे लावलेली नाहीत.
ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस अधीक्षक

मुलीला तूर्त धीर द्यायला हवा
पोलिसांनी कारवाई केली आहे. आजच्या घडीला खरी गरज आहे ती त्या मुलीला धीर द्यायची. मी सदस्या या नात्याने हा सगळा प्रकार राज्य महिला आयोगाला कळवला आहे. तेथून सूचना आल्यानंतर पुढचे पाऊल उचलणार आहे.
आशा भिसे, सदस्य, राज्य महिला आयोग

विधान परिषदेत मुद्दा मांडणार
लातूरमध्ये झालेला प्रकार घृणास्पद आहे. मुळात अशा संघटना आपला फायदा पाहून अशी कृत्ये करतात. यापूर्वीही लातूरमध्ये असे प्रकार घडले आहेत. मी हा मुद्दा विधान परिषदेमध्ये मांडणार आहे. हे प्रकरण तडीस लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
आ. नीलम गो-हे, शिवसेना नेत्या