आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळू तस्करी करणार्‍या ट्रॅक्टरने बालिकेचा अंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री - अवैध वाळू वाहतूक करणार्‍या भरधाव ट्रॅक्टरने शाळकरी मुलीला चिरडले. ही घटना रेलगाव-वाणेगाव या कच्च्या रस्त्यावर गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. इयत्ता सहावीतील रेणुका सोमीनाथ पवार (१२) या मुलीचा जागेवरच मृत्यू झाला.

रेलगाव येथे पाचवीपर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना वाणेगाव येथे जावे लागते. शाळा सुटल्यानंतर चार-पाच मुली रेलगावकडे येत होत्या. त्यांच्या मागून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर (एमएच २० एबी ७७५, ट्रॉली एमएच २० एबी ६०७९) येत होता. भरधाव ट्रॅक्टर पाहून मुली बाजूला पळाल्या. मात्र रेणुका ट्रॅक्टरखाली सापडली. त्यात तिचा अंत झाला.

हा रस्ता शेतातून गेला असल्याने रस्त्यावर सामसूम होती. याचा फायदा घेत चालकाने ट्रॅक्टर शेतात नेला. ट्रॉलीतील वाळू तिथे टाकून चालकाने पळ काढला. घटनास्थळी दाखल झालेल्या वाणेगाव येथील तलाठी सविता भटे यांच्यावर जमावाने प्रश्नांचा भडिमार केला. संतापलेल्या जमावाने पोलिसांनाही जुमानले नाही. दरम्यान, या घटनेचा फुलंब्री पोलिसांनी पंचनामा केला आहे.

कोल्हीजवळ अपघातात दोन ठार, तीन जण जखमी
खंडाळा - कोल्हीजवळील सुदामवाडी फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दोन ठार तर तीन गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी घडली. बाभूळगावहून वैजापूरकडे जाणारी दुचाकी (एमएच २० डीके ८९०३) व वैजापूरकडून औरंगाबादकडे जाणार्‍या दुचाकीची (एमएच १९ एजे ४०६३) धडक झाली. दोन्ही गाड्यांचे चालक गणेश शशिकांत लगडे (३०, रा. औरंगाबाद) व अंकुश पवार (३२, रा. पाली, रायगड) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दत्तात्रय जनार्दन लगडे (रा. औरंगाबाद), चिंतामण तावडे व शंकर कोल्हे दोघेही (रा. पाली, रायगड) हे तिघे गंभीर जखमी झाले.

बाजाठाण रस्त्यावर एक ठार, एक जखमी
वैजापूर - अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना वैजापूर-गंगापूर रस्त्यावरील बाजाठाण फाट्यावर गुरुवारी घडली. निवृत्ती नारायण भवर (२२, रा. शिरसगाव) असे मृताचे नाव आहे. शिरसगाव येथील निवृत्ती भवर व केशव भाऊसाहेब मलिक (३२) हे दोघे गुरुवारी दुपारी औरंगाबादकडे जात होते. वैजापूर-गंगापूर रस्त्यावरील बाजाठाण फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात निवृत्ती भवर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर केशव मलिक जखमी झाला. त्याच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरु आहे.