आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी देहाचा व्यापार; हैदराबाद येथून आरोपीला केली अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - मानवी देहाचा व्यापार प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथील पूनमचंद वर्मा या आरोपीला अटक केली. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या ११ झाली. पूनमचंद वर्मा याने या प्रकरणात महिलांच्या खरेदीसाठी मदत केल्याचा संशय आहे.
दैवशालाच्या बलात्कार प्रकरणानंतर उघडकीस आलेल्या मानवी देहाचा व्यापार प्रकरणाची व्याप्ती राजस्थानापासून हैदराबादपर्यंत असल्याचे पूनमचंद वर्मा याच्या अटकेवरून स्पष्ट झाले. वर्मा याचा या प्रकरणात सहभाग असल्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले होते. पोलिस त्याच्या मागावर होते, परंतु त्याचा ठावठिकाणा सापडत नव्हता. त्याच्या मोबाइल लोकेशनच्या टॉवरवरून पोलिसांनी त्याला शोधून अटक केली. त्याच्या अटकेमुळे दक्षिण भारतात काही मुलींची विक्री झाली का हे स्पष्ट होईल. दरम्यान, पूनमचंद वर्मा याला दुपारनंतर जिल्हा न्यायाधीश (पहिले) आनंद यावलकर यांच्यासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने २३ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
अनेक महिलांची विक्री
शहजादीबी, शहनाजबानो यांच्या टोळक्याने जिल्ह्यातील अनेक महिलांची विक्री केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परंतु त्याबाबत तक्रार देण्यास कोणी पुढे येत नाही. अशा महिलांवर पोलिसही दबाव टाकू शकत नाहीत. विक्री झालेल्या महिलांची केवळ नोंद घेऊन पोलिस पुढील तपास करीत आहेत. राजस्थानातील शहनाजबानो व हैदराबादच्या पूनमचंद वर्माच्या अटकेनंतर आता या प्रकरणाचे अजून नवे पदर उलगडत जाणार आहेत. अनेक वर्षांपासून हा धंदा सुरू होता. परंतु आत्यंतिक गरिबी आणि अब्रूची चाड यामुळे कोणीही या प्रकरणाची वाच्यता केली नाही. दैवशालावर झालेल्या बलात्काराने अनपेक्षितपणे या प्रकरणाला वाचा फुटली.