आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाड प्रकरण: \'विठाई’च्या विद्यार्थिनींवर दबाव आणण्‍याचा प्रयत्‍न, प्राचार्याला जामीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या विठाई नर्सिंग कॉलेजचा प्राचार्य राणा डोईफोडेला शुक्रवारी विद्यार्थिनींनी चोप दिल्यानंतर त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला. परंतु आता प्राचार्यांच्या कार्यकर्त्यांकडून तक्रारदार विद्यार्थिनींवर दबाव आणला जात असल्याचा आरोप होत असून शनिवारी त्यांनी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची भेट घेत संरक्षणाची मागणी केली. शुक्रवारी रात्रीच या प्रकरणात दहा मुलींचे इन कॅमेरा जबाब नोंदवले गेले.
 
विठाई नर्सिंग कॉलेजचा प्राचार्य राणा डोईफोडे हा विद्यालयातील प्रथम वर्षाच्या काही विद्यार्थिनींची छेड काढत असल्याचा प्रकार मागच्या चार ते पाच महिन्यांपासून घडत होता. एका विद्यार्थिनीला ‘तू एका मुलासोबत बोलत असतानाची व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे,’ असे म्हणत तिची छेड काढल्याने  तिने कुटुंबीयांना याची माहिती दिली. यानंतर शुक्रवारी तिच्या भावासह विद्यार्थिनींनी राणा डोईफोडे याला मारहाण केली. यानंतर ग्रामीण पोलिसांत त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र यानंतर आता तक्रारदार विद्यार्थिनीवर दबाव येत असून महाविद्यालय व्यवस्थापनासह इतर काही लोक दबाव आणत असल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे.  

यामध्ये राणा डोईफोडे, सर्जेराव डोईफोडे, सुमंत मुंडे, संस्थेचे संचालक डॉ.अमोल लहाने यांच्याकडून जीवितास धोका असल्याचे विद्यार्थिनींनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. महाविद्यालय प्रशासनही डोईफोडेच्या बाजूने असून यापूर्वीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष तर केले आहेच, पण आता ३० मे रोजी प्रात्यक्षिक परीक्षा अचानक ठेवण्यात आल्याचे विद्यार्थिनींनी अधीक्षक कार्यालयात माध्यमांशी बोलताना सांगितले. 
 
शनिवारी विद्यार्थिनींसह काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी  पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची भेट घेत म्हणणे मांडले. डोईफोडे याला जामीन मिळू नये यासाठी तपास अधिकाऱ्यांनी त्याच्या कोठडीची मागणी न्यायालयात करावी, असा आग्रहही मुलींनी अधीक्षकांकडे धरला.  दरम्यान, न्यायालयाने राणाला जामीन मंजूर केला आहे.
 
संदर्भ
बातम्या आणखी आहेत...