आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Student Committed Suicide In Mazalgaon Government Hostel

माजलगावात शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - शहराच्या जुना मोंढा भागातील शासकीय वसतिगृहातील इयत्ता नववीत शिक्षण घेणा-या स्वाती गोविंद शेळके (१२) या विद्यार्थिनीने विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता घडला. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण स्पष्ट झालेले नाही.

माजलगाव शहरातील जुना मोंढा भागात मुलींचे शासकीय वसतिगृह असून या वसतिगृहात नववी ते पदवीधरपर्यंतचे शिक्षण घेणा-या ६२ मुली आहेत. मंगळवारी सायंकाळी सात वाजता नववीतील स्वातीने रॅटकिलची वडी खाल्ली. त्यानंतर पोटात दुखत असल्याचे वसतिगृहातील कर्मचा-यांना सांगितले. तेव्हा तिच्या वर्गातील दोन मुली स्वातीसह यशवंत हॉस्पिटलमध्ये गेल्या. सायंकाळी साडेसात वाजता डॉ.यशवंतराजे भोसले यांनी मुलीवर उपचार करून विष घेतल्याने मुलीला चकरा येणे, पोटदुखीचा त्रास झाल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकाराबाबत माहिती मिळताच बुधवारी दुपारी माजलगाव शहर पोलिसांनी शासकीय वसतिगृहात धाव घेत पंचनामा केला. सायंकाळी बीड येथील समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे यांनी शासकीय वसतिगृहाला भेट देवून चौकशी केली. दरम्यान, या मुलीला पोटाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मी विष घेतलेे नाही. पोटात दुखत असल्याने दवाखान्यात उपचारासाठी आले आहे, असा जबाब स्वातीने दिला आहे.

अहवाल वरिष्ठांना पाठवणार
मुलीकडे विष कसे आले, याची चौकशी करून सविस्तर अहवाल वरिष्ठांना पाठवला जाईल. दोषींवर कारवाई करण्यात येईल. संतोष जैन, प्रभारी गृहपाल, माजलगाव वसतिगृह

१० सुरक्षारक्षक नावालाच
पोट दुखत असल्याचे स्वातीने वसतिगृहातील कर्मचा-यांना सांगितले. तेव्हा नववीतील दोन मुली तिच्याबरोबर दवाखान्यात गेल्या. मात्र, एकही कर्मचारी त्यांच्याबरोबर गेला नाही, अशी नोंद वसतिगृहाच्या रजिस्टरमध्ये करण्यात आली आहे. विषेश म्हणजे क्रिस्टन या कंपनीने या ठिकाणी सुरक्षेसाठी १० सुरक्षारक्षक दिले आहेत.