आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली: तिसरीची पोरगी मित्रांवर रोखायची बंदुक, शिक्षकांना दाखवायची काडतुसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- येथील एका इंग्रजी शाळेतील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीच्या दप्तरात पिस्तूल सापडल्याने उडालेल्या खळबळीनंतर चांगलेच मजेदार आणि तेवढेच गंभीर खुलासे होत आहेत. सदर विद्यार्थिनीचे वडील आणि प्रकरणातील आरोपी पेशाने माजी सैनिक आणि वाहनचालक असून त्याने हौस म्हणून गावठी कट्टा खरेदी केला होता, तर त्याची मुलगीही शौक म्हणून कट्टा शाळेत नेत होती आणि मित्रांना बंदूक अशी असते, असे दाखवत होती.
 
हिंगोली रिसाला- श्रीनगर भागात राहत असलेला प्रकरणातील आरोपी सय्यद मुस्ताक सय्यद आजम (४२) हा माजी सैनिक (वाहनचालक) आहे. सध्या तो वाशीम येथे पाटबंधारे विभागात वाहन चालक पदावर कार्यरत आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून शस्त्र कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शहर पोलिस ठाण्याचे पीआय जगदीश भंडारवार यांनी सांगितल्यानुसार, चौकशीदरम्यान आरोपीने बरीचशी माहिती दिली. ग्वाल्हेर येथे कार्यरत असताना २००२ मध्ये २००० रुपयांत ९ काडतुसांसह त्याने गावठी कट्टा खरेदी केला होता. २०११ मध्ये सैन्यातील नोकरी सोडून येथे आल्यावर त्याने २०१२ मध्ये वाशीम येथील पाटबंधारे विभागात वाहन चालक म्हणून नोकरी मिळवली. घरी असताना तो मुलांना पिस्तूल आणि त्यातील काडतुसे नेहमीच दाखवत होता. विशेष बाब म्हणजे कट्टा आणि काडतुसे खेळण्याप्रमाणे तो मुलांना हाताळण्यास देत असे. 

विद्यानिकेतन इंग्रजी शाळेत वर्ग तिसरीमध्ये शिकत असलेली त्याची मुलगी शाळेत पिस्तूल, काडतुसे घेऊन जात होती. १५ दिवसांपूर्वीच तिने मित्रांना काडतुसे दाखवली. त्या वेळी वर्ग शिक्षिकांना काडतुसे म्हणजे बंदुकीच्या गोळ्या आहेत, हेच कळले नाही.  

शिक्षिकेने तिला ही काय वस्तू आहे, असे म्हणून पुन्हा न आणण्यास सांगितले. तर सोमवारी सदर मुलीने कुतूहल म्हणून पिस्तूलच मित्रांना दाखवल्याने शिक्षकांची घाबरगुंडी उडाली. मुख्याध्यापक ए. के. जगदाळे यांनी पोलिसांना माहिती दिली आणि मुलीला ताब्यात घेण्यात आले.   नंतर मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली. येथील न्यायालयात आरोपीला गुरुवारी हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.  

.... तर भयंकर घडले असते  
जप्त करण्यात आलेले पिस्तूल हा गावठी कट्टा आहे. कट्ट्यात एका वेळी एक काडतूस बसते. सर्व ९ काडतुसे जिवंत असून दोन काडतुसांच्या पुंगळ्याही आहेत. प्रमाणित पिस्तुलाप्रमाणे गावठी कट्ट्याला कोणतीही सुरक्षितता नसते. लॉक, अनलॉक पद्धत त्यात नसल्याने कोणीही कधीही त्यातून गोळी झाडू शकतो. कट्टा जप्त केला त्या वेळी त्यात काडतूस नव्हते. कट्ट्यात कधी कधी काडतुसेही भरलेली असतात. काडतूस भरलेला कट्टा मुलीच्या हाती पडला असता तर भयंकर घटना घडली असती.
- जगदीश भंडारवार, पोलिस निरीक्षक
बातम्या आणखी आहेत...