आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किशोरींना मिळणार सॅनिटरी नॅपकीन, ‘अाशा’कडून होणार मार्गदर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - मासिक पाळीतील स्वच्छतेसाठी किशोरवयीन मुलींना गावपातळीवर आशा कार्यकर्तीमार्फत माफक दरात सॅनिटरी नॅपकीन देण्यात येणार आहे. पाळीतील समस्याबाबत किशोरींचे गृहभेटीद्वारे आशा कार्यकर्तीमार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे. हा उपक्रम किशोरवयीन आरोग्य कार्यक्रमांतर्गत राज्यातील ३४ जिल्ह्यामध्ये २०१६-१७ मध्ये राबवण्यात येणार आहे. गतवर्षी राज्यातील आठ जिल्ह्यांत हा उपक्रम राबवण्यात आला असून त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. यामुळे इतर जिल्ह्यातही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
ही योजना राज्याच्या ग्रामीण भागातील १० ते १९ वर्षांतील मुलींसाठी निश्चित करण्यात आली आहे. २०१५-१६ मध्ये राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, बुलडाणा, अमरावती, लातूर, बीड, सातारा जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. याचा किशोरवयीन मुलींना चांगला फायदा झाल्याचे दिसून आले आहे. याबाबत राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे येथे २९ एप्रिल २०१६ रोजी आढावा बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत २०१६-१७ मध्ये राज्यातील ३४ जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अतिरिक्त आरोग्य संचालकांनी जिल्ह्यात योजना राबवण्यात येणार असल्याचे पत्रही पाठवले आहे. यामध्ये किशोरवयीन मुलींच्या अडचणीही सोडवण्यात येणार आहेत. गावपातळीवर आशा कार्यकर्ती महिन्याला एक बैठक घेऊन किशोरवयीन मुलींना मासिक पाळीविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
‘आशां’कडून मार्गदर्शन : गावपातळीवर किशोरवयीन मुलींमध्ये आशामार्फत प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे अथवा गावपातळीवर बैठकीचे आयोजन करून मासिक पाळीमधील स्वच्छतेविषयी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देणार आहेत. ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना माफक दरात सॅनिटरी नॅपकीन गावपातळीवर आशामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या मुली बैठकीला हजर राहणार नाही, त्यांच्या घरी जाऊन माहिती सांगण्यात येणार आहे.
६ रुपयांना मिळणार पॅक : मासिक पाळीतील गैरसमजुतीमुळे तसेच स्वच्छतेअभावी मुलींना भविष्यात विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे शासनाच्या विशेष योजनेतून गावपातळीवर किशोरींना घरपोच सहा रुपयांत सॅनिटरी नॅपकीन पॅक देण्यात येत आहे. यामध्ये सहा सॅनिटरी नॅपकीन असणार आहे.
"आशा'चा फायदा
केंद्रशासनामार्फत "फ्रीडेज' या नावाने ६ सॅनिटरी नॅपकीनचे पॅक प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत एएनएम स्तरावर पुरवण्यात येणार आहे. अन्टाइड फंडमधून आशा कार्यकर्त्यांना ३०० रुपयांचा रिव्हॉलिंग फंड अग्रीम स्वरूपात द्यावयाचा आहे. या प्राप्त निधीतून आशांनी एएनएमकडून प्रति पॅक ५ रुपये दराने सॅनिटरी नॅपकीन पॅक खरेदी करावयाचे आहेत. ते ६ रुपयांना द्यावयाचा आहे. आशांना १ रुपयाचा फायदा मिळेल.
घरपाेच वाटप
मासिक पाळीत स्वच्छता ठेवण्यासाठी गावपातळीवर आशांमार्फत सॅनिटरी नॅपकीन घरपोच वाटप करण्यात येणार आहेत. पाळीबाबत गृहभेटीद्वारे किशोरींना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा उपक्रम जिल्ह्यात राबवण्यासाठी अतिरिक्त आरोग्य संचालकाचे पत्र आले आहे. त्यांच्या सूचनेनुसार अंमलबजावणी होणार आहे.
डॉ. शिवाजी फुलारी, प्रभार जिल्हा आरोग्य अधिकारी, उस्मानाबाद.
बातम्या आणखी आहेत...