आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांना नव्याने कर्ज द्या - शरद पवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरद पवार यांनी तेरणा परिसरात पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. - Divya Marathi
शरद पवार यांनी तेरणा परिसरात पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
उस्मानाबाद - मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, जालना आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यांत या वर्षी भीषण दुष्काळी स्थिती आहे. येथील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना नवीन कर्ज देणे गरजेचे आहे. तरच येथील शेतकरी पेरणी करू शकतील. तसेच फळबागांना योग्य अनुदान मिळण्यासह दुधाला दरवाढ देणे अपेक्षित आहे. याबाबत मंगळवारी (दि.२) मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांचं दुखणं त्यांना सांगणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली.

शनिवारपासून पवार मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत. सोमवारी येथील सरकीट हाऊसमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राबवण्यात येत असलेल्या "तेरणा जलसंधारण-लोकाभियान'चा दुधगाव येथे पवार यांच्या हस्ते शुभारंभ झाला. तेरणा धरणाच्या पायथ्याशी त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. या विविध ठिकाणी पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आवर्जून उपस्थित केला.

"आमचे सरकार सत्तेत असताना एकदा शेतकऱ्यांची सरसकट ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली हाेती. आता सरसकट कर्जमाफी करा, असा आग्रह सरकारकडे धरणार नाही, परंतु दुष्काळामुळे होरपळणाऱ्या मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची शेती कर्जे माफ करण्याची मागणी शासनाकडे करणार आहे.' आमचे सरकार असताना फळबागांसाठी ३० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. सध्या मात्र हेक्टरी १२ हजार रुपये देण्यात येत आहेत. शिवाय सरकारने शेतकऱ्यांकडील दुधाला २० रुपये प्रतिलिटर दर देण्याचा निर्णय घेतला आहे. कडबा व पेंढीचे वाढलेले भाव पाहता हा दरही परवडणारा नाही. प्रत्यक्षात १६ ते १७ रुपये प्रतिलिटर दर देण्यात येत आहे. त्यामुळे दुग्धव्यावसाय मोडीत निघण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ऊस, दूध अन् पाणीटंचाई
या दौऱ्यात पवारांसमोर शेतकऱ्यांनी विशेषत: ऊस, दूध आणि पाणीटंचाईची समस्या मांडली. मंगरूळ येथील शेतकरी अमर बिराजदार यांनी प्राप्त परिस्थिती पशुधन जगवण्यासाठी अत्यंत प्रतिकूल असल्याने दुधाच्या दरात वाढ करण्याची मागणी केली. याकतपूर येथील शेतकरी रफिक शेख यांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित करून टँकर वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे गाऱ्हाणे मांडले. उजनी येथील ऊस उत्पादक शिवाजी धवन यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील एका साखर कारखान्याने िबलाची रक्कमच दिली नसल्याची तक्रार केली.