आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंकजाताईंना पाठबळ द्या, गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी महंत नामदेवशास्त्री महाराज यांचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - समाजोद्धाराचा ध्यास घेऊन जनसेवेसाठी आयुष्य समर्पित करणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे हे आपल्यासाठी दैवतच आहेत. जन्मभर दातृत्वासाठी ज्यांनी स्वार्थाचा कधीही विचार केला नाही, अशा लोकोत्तर पुरुषांत त्यांचा समावेश होतो. त्यांचा वारसा समर्थपणे पेलणा-या पंकजा मुंडे यांच्यात साहेबांची प्रतिमा दिसते. म्हणून साहेबांचा वारसा पेलणा-या पंकजाताईंना पाठबळ दिले पाहिजे, असे आवाहन भगवानगडाचे मठाधिपती महंत नामदेवशास्त्री
महाराज यांनी केले.

परळी तालुक्यातील पांगरीजवळील गोपीनाथगडावर बुधवारी सकाळी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कीर्तनप्रसंगी शास्त्री बोलत होते. सुरुवातीला मठाधिपती नामदेवशास्त्री, उद्योगमंत्री प्रकाश मेहता, गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी आमदार विनायक मेटे, रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर, आमदार अतुल सावे, नारायण कुचे, मनीषा लोकरे, आर. टी. देशमुख, संगीता ठोंबरे, अॅड. लक्ष्मण पवार, डॉ. राजेंद्र फडके, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, फुलचंद कराड, अनुराधाताई सानप, संदिपान महाराज हासेगावकर, महादेव महाराज चाकरवाडीकर आदी उपस्थित होते.
नामदेवशास्त्री म्हणाले, मुंडे साहेबांना अापण दैवत मानतो, कारण त्यांच्या जीवनप्रवासाला दैवी अवताराची लक्षणे लागू होतात. त्यांनी लाखो लोकांचे जीवन प्रकाशमय केले. साहेबांच्या जाण्याने पोरक्या झालेल्या महाराष्ट्रातील जनतेला आधार देण्यासाठी पंकजाताई या काळजी घेत आहेत. आता ताईसोबतच साहेबांची प्रतिमा असल्याने हे नेतृत्व आपले मानबिंदू बनले आहे, असेही ते म्हणाले. या वेळी उद्योगमंत्री प्रकाश मेहता, गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनीही विचार व्यक्त केले. पंकजाताई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सदैव काम करणार आहोत.

मंुडे यांच्यामुळे महाराष्ट्रात सत्ता आली असून त्यांच्या नावाने एखादी मोठी योजना शासनाने सुरू करावी, अशी अपेक्षा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केली. औरंगाबाद येथे ज्याप्रमाणे मंुडे यांचे स्मारक होत आहे त्याचप्रमाणे मुंबईलाही मोठे स्मारक झाले पाहिजे, अशी अपेक्षा आमदार भीमराव धोंडे यांनी व्यक्त केली. हजारो भाजप कार्यकर्त्यांनी गोपीनाथगडावर गर्दी केली होती.

कुटुंबीयांनी घेतले गोपीनाथ गडावरील समाधीचे दर्शन
गोपीनाथगड येथे प्रज्ञाताई, पंकजा, डॉ. प्रीतम, जावई डॉ. अमित पालवे, डॉ. गौरव खाडे, अॅड. यशश्री यांनी भेट देऊन लोकनेत्याच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. परळी तालुक्यातील दिंड्या गोपीनाथगड येथे आल्या होत्या.

बाबांचे नाव विसरू देणार नाही
साहेबांचा वारसा चालवणे साेपे काम नाही. जनसामान्यांसाठी त्यांनी पाहिलेली असंख्य स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी मी खांद्यावर घेतलेली आहे. माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करून दाखवीन तशी माझी वाटचाल सुरूही आहे. एका दुर्दैवी परिस्थितीत मला व माझ्या कुटुंबाला आधार देणा-या सामान्य जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. गोपीनाथ मुंडे हे नाव मी विसरू देणार नाही. या नावाचा झेंडा सतत फडकत राहील, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.