आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाब मलिक उभारत असलेल्या कत्तलखान्याविरोधात न्यायालयात जाणार - नितीन काळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्नी व अपत्यांच्या नावावर जवळा (दुमाला) व आळणी (ता. उस्मानाबाद) शिवारात कत्तलखाना उभारण्यासाठी सुमारे 59 हेक्टर 81 गुंठे जमीन खरेदी केली आहे. या कत्तलखान्यास आपचा विरोध असून प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
काळे म्हणाले, मलिक यांनी उस्मानाबाद शहराजवळ आळणी आणि जवळा (दुमाला) शिवारात रोज पाच हजार पशुधनाची कत्तल करण्याची क्षमता असणारा कत्तलखाना सुरू करण्याचा घाट घातला आहे. यासाठी बागायती 59 हेक्टर 81 गुंठे जमीन खरेदी केली आहे. दोन कोटी सात लाख रुपये किंमत दाखवून ही जमीन त्यांची पत्नी व अपत्य मेहजबीन, सना, आमिर, फराज, निलोफर खान, बुर्शा फराज यांच्या नावे खरेदी केली आहे. त्यांनी वसंतराव भाऊसाहेब मुरकुटे, त्यांच्या पत्नी नंदा, मुलगा संदीप, सूर्यकांत, सुना कल्पना, रूपाली (सर्व रा. बाणेर, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याकडून ही जमीन खरेदी केली आहे. वास्तविक जमिनीची किंमत तीन कोटींपेक्षाही अधिक आहे. मात्र, त्यांनी सहा लाखांचे मुद्रांक शुल्क बुडवले. कत्तलखान्याविरोधात भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच याबाबत शासनाकडे कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. सत्तेचा उपयोग करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा पुर्नरुच्चारही काळे यांनी यावेळी केला.
खरेदी केलेल्या जमिनीवर सुमारे 50 लाखांचा बंगला आहे. या बंगल्याचे मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी खोटी माहिती दस्तात नोंदवली आहे. केवळ ‘बांधकाम केलेले घर’ असा उल्लेख दस्तात असल्याचा आरोपही काळे यांनी केला. पत्रकार परिषदेस जिल्हा सरचिटणीस अँड. अनिल काळे, सतीश देशमुख, कार्यकारिणी सदस्य डॉ. गोविंद कोकाटे उपस्थित होते.
सीआयडीमार्फत चौकशी करा
शेती खरेदी करताना पुरावा जोडावा लागतो. मात्र, या व्यवहारादरम्यान मलिक यांच्या नातेवाइकांनी कसलाही पुरावा जोडलेला नसल्याचे काळे म्हणाले. याप्रकरणी सीआयडीमार्फत कसून चौकशी करण्याचीही मागणी काळे यांनी केली.