परभणी - २५ वर्षांत भाजपसोबत चालताना अफझलखानाची फौज दिसली नाही का, असा सवाल उपस्थित करत आधी युती तोडण्यामागील शिवसेनेतील सूर्याजी पिसाळ शोधून काढा. अपमानास्पद शिवराळ भाषा वापरू नका, मुळात युतीचा धर्मच तुम्हाला समजलेला नाही, असा टोला गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी येथे लगावला. १५ वर्षांत सत्तेची भाकरी एकाच बाजूने राहिल्याने करपली आहे, तिला फिरवण्याची गरज असून आता ती वेळ आली आहे, भाजपला एकहाती सत्ता द्या, गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्राचा विकास करू, असे आवाहनही त्यांनी केले. परभणीत जनसंवाद या कार्यक्रमात ते बोलत होते.
चव्हाण झोपा काढणारे मुख्यमंत्री
जालना |माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा मिस्टर क्लीन असल्याचे बोलले जाते. मात्र, जो माणूस झोपा काढण्याऐवजी काहीच करीत नाही त्याची प्रतिमा कशी असणार हे तुम्हीच ठरवा, अशा शब्दांत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. गोंदी येथे भाजप उमेदवार विलास खरात यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.