आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरीची गटारगंगा, पाणी प्रदूषित झाल्याने दुर्गंधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली गोदावरी नदी शहरात गटारगंगा झाली. गोवर्धनघाट ते वाजेगावदरम्यान नदीच्या पात्रातील पाणी पूर्णत: प्रदूषित झाल्याने त्याची दुर्गंधी आजूबाजूच्या परिसरातही पसरत आहे. नदीचा प्रवाहच खंडित झाल्याने यावर तूर्तास उपाय नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ब्रह्मगिरी ते राजमुंद्री या गोदावरी नदीच्या १४६५ किलोमीटर प्रवासाचा नांदेड हा मध्यबिंदू आहे. त्यामुळे शहराला गोदावरीचे नाभिस्थान म्हणून ओळखले जाते. सचखंड हुजुरसाहिब गुरुद्वारा, लंगरसाहिब गुरुद्वारा, बंदाघाट, नगिनाघाट, शिकारघाट या गुरुद्वाराच्या पायथ्याशी नदीचा प्रवाह आहे. देशविदेशातून येणारे कोट्यवधी शीख भाविक पवित्र तीर्थ म्हणून गोदावरीचे जल सोबत घेऊन जातात. नाभिस्थान असल्याने कोट्यवधी हिंदूही आप्ताच्या मृत्यूनंतर त्याला स्वर्ग प्राप्त व्हावा म्हणून दिवसवार करण्यास येथे येतात.

चित्र असे आहे
धार्मिक, सामाजिक, मानवी जीवनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या गोदावरी नदीचे चित्र मात्र क्लेशदायक आहे. गोवर्धनघाट ते वाजेगाव बंधारादरम्यान नदीच्या पात्रातील पाणी सडले आहे. निर्माल्य, कचरा, प्लॅास्टिक यासोबतच शहरातील सांडपाणीही नाल्याद्वारे नदीच्या पात्रात मिसळत असल्याने परिसरातील दुर्गंधीत वाढ होत आहे.
बंधारे घातक ठरले
पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, सिंचनाला पाणी मिळावे या उद्देशाने गोदावरी नदीच्या पात्रात बंधारे बांधण्यात आले. बाभळीपासून जायकवाडीपर्यंत ११ बंधाऱ्याची साखळी बांधण्यात आली. बंधाऱ्यामुळे नदीचा प्रवाह खंडित झाला आहे. वाहणारे पाणी एका जागी स्थिर झाल्याने प्रदूषणाची वाढ झपाट्याने होत आहे.

पाणी सोडणे अशक्य
पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदुरा बंधाऱ्याचे बॅक वॉटर गोवर्धन घाटापर्यंत आले आहे. आमदुरा बंधारा भरलेला आहे. प्रदूषित पाणी सोडायचे झाल्यास आमदुरा बंधाऱ्यातील पाणी सोडावे लागेल. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत हे शक्य नाही. त्यामुळे पाऊस येऊन नदीला पूर येत नाही तोपर्यंत यावर काही उपाययोजना करता येणार नाही.
...तर ही वेळ आली नसती
गोदावरीच्या शुद्धीकरणासाठी गेल्या २० वर्षांपासून लढा देणारे माजी नगरसेवक इंद्रजितसिंघ गल्लीवाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोंढार येथील प्रकल्पाला १९९८ मध्ये मंजुरी मिळाली. १५ कोटींचा निधी मिळाला. हा प्रकल्प अजून पूर्ण झाला नाही. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी व कचऱ्याचे खत तयार झाले असते. गोदावरीची ही अवस्था झाली नसती.
सांडपाणी वाहत नदीपात्राकडे येते
^बोंढार आणि एलिचपूर येथील दोन प्रकल्प सुरू आहेत. आसना नदीवरील प्रकल्प सहा महिन्यांत पूर्ण होईल. गोदावरी नदीचा प्रवाह थांबला आहे. नदीपात्र शहराच्या मानाने खोल असल्याने नैसर्गिकरीत्या सांडपाणी वाहत नदीपात्राकडे येते. त्याचाही लवकर महापालिकेच्या वतीने बंदोबस्त करणार. सर्व नाले सांडपाण्याचा निचरा करणाऱ्या पाइपलाइनला जोडले आहेत. एखादा राहिला आहे.
सुशील खोडवेकर, आयुक्त, महानगरपालिका, नांदेड
बातम्या आणखी आहेत...