आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आष्‍टीत सोनसाखळी चोरट्यांना पुन्हा बेड्या ठोकल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी - जिल्हाभरात सोनसाखळी चोर्‍यांनी पोलिसांची झोप उडवणार्‍या आणि मोक्कांतर्गत अटकेत असलेल्या चार आरोपींनी गुरुवारी पहाटे आष्टीत लॉकअपमधील स्वच्छतागृहाच्या भिंतीला भगदाड पाडून पलायन केले. पिठोरी अमावास्येला झोप उडवून देणार्‍या या घटनेत पोलिस, ग्रामस्थ आणि आरोपींत मंगरूळ शिवारात थरारनाट्य घडले. पोलिसांनी शिताफीने तिघांना जेरबंद केले असून एक आरोपी गुंगारा देत पळाला.

अक्षय ऊर्फ चिंटू मिठू गायकवाड, रवींद्र विष्णू मस्के आणि शंकर तानाजी जाधव अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. भीमा लक्ष्मण मस्के याने पलायन केले. या चौघांवर सोनसाखळी, गंठण चोरीचे 47 गुन्हे दाखल झाले. कड्यात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्याच्या घटनेतही हेच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आष्टीचे पोलिस निरीक्षक त्र्यंबक तांदळे यांनी या चौघांवर मोक्कांतर्गत कारवाई केली. न्यायालयाच्या आदेशानुसार या चौघांचीही रवानगी बीड येथे जिल्हा कारागृहात झाली. या आरोपींनी 28 फेब्रुवारी 2013 रोजी कडा येथील निर्मला जोशी यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी या चौघांनाही 31 ऑगस्ट रोजी आष्टीत आणण्यात आले. औरंगाबाद येथील मोक्का न्यायालयात उभे केले असता त्यांना सहा सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. त्यानुसार त्यांना आष्टी येथील पोलिस कोठडीत ठेवण्यात आले.

गुरुवारी पहाटे एक ते पाच या वेळेत पोलिस कोठडीतील स्वच्छतागृहाची भिंत फोडून हे चौघेही पसार होऊ लागले, याच वेळी सहायक पोलिस निरीक्षक बी. बी. वडदे मॉर्निंग वॉक करत ठाण्यातून फेरफटका मारण्यासाठी नेहमीप्रमाणे आले. त्या वेळी अंधारात पश्चिमेकडील संरक्षक भिंतीजवळ घोटाळलेले काही जण दिसले. ते जवळ जाताच चारही आरोपी पळत सुटले. पोलिसही त्यांच्या मागावर होते. आष्टीपासून पश्चिमेला मंगरूळ परिसरात आरोपींना तोडकर वस्तीवर गौतम तोडकर या शेतकर्‍याने हटकले. मात्र, शिवीगाळ करून आरोपी पळाले. त्यांनी ही बाब सरपंचास सांगितली. तोपर्यंत अंभोरा पोलिस, बीड येथून स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक पोहोचले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने तीन जणांना जेरबंद केले तर भीमा लक्ष्मण मस्के याने उत्तर दिशेने पलायन करून पोलिसांना गुंगारा दिला.


इमारतीचे बांधकामच निकृष्ट
आष्टी पोलिस ठाण्याची इमारत 2006-07 मध्ये 23 लाख रुपये खचरून बांधण्यात आली. कंत्राटदाराने निकृष्ट साहित्य वापरून घाईत बांधकाम पूर्ण केल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षकांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती. आता घटना घडल्यानंतर पंचनामा करून या भिंतीसाठी वापरलेल्या साहित्याबाबत आणि बांधकामाबाबत गुणनियंत्रण पथकाकडे नमुने पाठवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

तीन दिवसांत पाडले भिंतीला छिद्र
पोलिस ठाण्यात लॉकअपची रचना व्यवस्थित नाही. इमारतीच्या उत्तरेकडील भिंतीलगत स्वच्छतागृह आहे. केवळ नऊ इंच जाडीची भिंत आरोपींनी तीन दिवस संडासमध्ये बसून कोरली. 2 फूट छिद्रातून ते पसार झाले.