आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Good Production Of Vegetables In Drought Situation

लातूर जिल्ह्यात दुष्काळातही भाजीपाल्याचा सुकाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - जिल्ह्यात पाण्यासाठी प्रतिकूल परिस्थती असली तरी शेतक-यांनी प्राप्त जलस्रोतांचा वापर करून भाजीपाला पिकवला आहे; परंतु त्याचे उत्पादन वाढल्याने गेल्या महिनाभरात सर्वच भाज्यांच्या दरात जवळपास ३० टक्क्यांनी घसरण झाली आहे. परिणामी बटाटे, टोमॅटो, काकडी आदींचे भाव तर कमालीचे खाली आल्याने दुष्काळात झालेला भाज्यांचा सुकाळ ग्राहकांना सुखावणारा आहे.

येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा जोतिबा फुले भाजी मार्केटमध्ये भरउन्हाळ्यातही रोज सात ते आठ टन भाज्यांची आवक होत आहे. हा माल स्थानिक तसेच उस्मानाबाद, सोलापूर आणि बीड जिल्ह्यातून येत आहे. गत तीन वर्षांपासून पर्जन्यमान सातत्याने घटत असल्याने बारमाही उसाला पाणी देणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शेतकरी उसाची शेती मोडून कमी वेळेत आणि अल्प पाण्यावर येणाऱ्या भाजीपाल्याकडे वळू लागले आहेत. पर्यायाने उत्पादनात वाढ होऊन भाव पडत आहेत. सध्या मागणीही कमीच असून चालू महिन्यात लग्नतिथीही जेमतेमच आहेत. त्याचाही भाज्यांच्या दरावर परिणाम झाला आहे.

ठोक बाजारातील दर (प्रतिकिलो)
बटाटे- ८ ते १२, टोमॅटो- ४ ते ५, पांढरी काकडी- ३ ते ४, हिरवी काकडी- ८ ते १०, गवार-१५ ते २०, वांगे- १५ ते २०, मेथी- ८ ते १० रु. पेंडी, कोथिंबीर- १५ ते २०, शेवगा- १५ ते २०, भेंडी २५ ते ३०, दोडका- २५ ते ३०, मिरची-२० ते २५, शिमला मिरची- २० ते २५, अद्रक- ५० ते ६०, लसूण- ४० ते ५०, कांदा- १० ते १२ रुपये प्रति किलो.

अवकाळीचा फटका बसू शकतो
चार-पाच दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. काही ठिकाणी गारपीटही होत आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे नुकसान होणार आहे. चिखल झाल्यास काढणीला आलेल्या भाज्यांची कापणी करता येणार नाही. तसेच पावसाच्या तडाख्यामुळे पानेफुले गळणार असून त्याची नासाडीही होण्याची शक्यता आहे. बेमोसमी पावसाचा कसा आणि किती प्रमाणात फटका बसला, हे पुढील आठवड्यात कळणार आहे.