आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Goon Died In Police Encounter, Incident Occured In Beed District

कुख्यात गुंड पोलिस चकमकीत ठार, बीड जिल्ह्यातील धोंडराईजवळ श्याम आठवलेचे शूटआऊट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई/बीड - चोरी, खंडणी, लूटमारीच्या ५० गुन्ह्यांत दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी श्याम भीमराव आठवले पोलिसांसोबतच्या चकमकीत रविवारी गेवराई तालुक्यात धोंडराईजवळ ठार झाला. पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी घटनास्थळाला भेट दिली.
श्याम आठवले (४०, सुभाष रोड, बीड) दुपारी २ वाजता धोंडराईला गेला होता. कारने (एमएच १४ बीसी २९२३) तीन साथीदारांसह तो पुढे शेवगावमार्गे शिर्डीला निघाला. मात्र, कार अचानक बंद पडल्याने तो उतरला. तीन साथीदार कारमध्येच होते. मागावरील गुन्हे शाखेचे पथक पोहोचले. श्यामने पोलिस वाहनावर गोळीबार केला. प्रत्युत्तरात सहायक निरीक्षक राहुल देशपांडे यांनी तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी श्यामच्या छातीत घुसली. घाटी रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

माजी सभापतीला अटक
कारमधील तीन साथीदारांपैकी एक फरार असून दोघांना अटक झाली. त्यात जि.प.चे माजी समाजकल्याण सभापती गीताराम डोंगरे यांचा समावेश आहे. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत गेवराई-शेवगाव मार्ग ठप्प होता. सहायक निरीक्षक देशपांडे यांच्या तक्रारीवरून श्यामने पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल झाला.

एन्काउंटरमुळे २५ वर्षांची दहशत आली संपुष्टात
श्याम आठवलेचा मुलगा सनीला रविवारी सकाळी पोलिसांनी इंदूर येथे अटक केली होती. पोलिसी खाक्या दाखवताच श्यामचा ठिकाणा त्याने सांगितला. श्याम शस्त्रांसह बीडमध्ये दाखल झालेला आहे. तो दरोड्यासारखा गुन्हा करू शकतो, अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी धोंडराईपर्यंत पाठलाग करून श्यामला कंठस्नान घातले. यामुळे मागील २५ वर्षांपासूनच्या गुन्हेगारीला लगाम लागला आहे. बीडमधील व्यापा-यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

अट्टल आरोपी श्याम आठवले याचे स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी गेवराई तालुक्यातील धोंडराईजवळ रविवारी दुपारी ३ वा. एन्काउंटर केले. बीड तालुक्यातील कुर्ला येथील मूळचा रहिवासी असलेला श्याम ३० वर्षांपूर्वी बीडमध्ये स्थायिक झाला. बीडमध्ये जबरी चो-या, दरोड्यासह खंडणीच्या गुन्हाकडे तो वळला. काही वर्षे त्याचा राजकारणाशीही संबंध आला. बीड शहर व शिवाजीनगर ठाण्यात त्याच्यावर जवळपास २२, तर नगर जिल्ह्यातील राहुरी पोलिस ठाण्यातही दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. शस्त्राचा धाक दाखवून काठोडा येथील राठोड नावाच्या एका व्यक्तीचे त्याने दोन वर्षांपूर्वी अपहरण केले होते. राठोड नावाच्या व्यक्तीचा अजून तपास पोलिसांना लावता आला नाही. बीड शहरात गावठी रिव्हॉल्व्हर विक्री केल्याप्रकरणीही बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बीड शहरातील त्याची वाढती गुन्हेगारी पोलिसांना तापदायक ठरू लागली. त्यातच २४ ऑक्टोबर २०१४ बीड शहरातील नेताजी मार्गावरील सुजित सुरेंद्र काटकर यांच्या राजेश स्टीलवर सायंकाळी दीपावली पाडव्याच्या दिवशी श्याम आठवलेसह त्याची दोन मुले सनी व आशिषसह जवळपास सात जणंानी दरोडा टाकून दुकानातील एक लाख ५४ हजारांची रोकड लांबवली होती. काही महिन्यांपूर्वीच याच भागातील छोटू कुकडेजा यांच्या घरात घुसून सोने व रोकड पळवली होती. दरोडा प्रतिबंधक पथकाच्या पोलिसांनी यातील सनी व आशिष या दोघांना अटक केली होती. यात पोलिसांना दहा हजार रुपयांची रोकड व एक पिस्तूल जप्त केले होते. या घटनेनंतर दोन महिन्यांपासून श्याम फरार होता. त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशला जाऊन आले होते. डिसेंबर महिन्यातील शनी अमावास्येला तो शनिशिंगणापूर येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी एक पथक शनिशिंगणापूरला पाठवले होते. परंतु तो हाती लागला नव्हता.

राहुल देशपांडे धडाकेबाज अधिकारी
मागील २५ वर्षांपासून बीडमध्ये लूटमार, दरोडा, अपहरण, करणा-या श्याम आठवलेचे एन्कांउटर करण्याची हिंमत एकाही पोलिस अधिका-याची झाली नाही. केवळ सहा महिन्यांपूर्वी उस्मानाबाद येथून बीडच्या स्थानिक गुन्हा शाखेत बदलीने आलेले राहुल देशपांडे हे यासाठी धडाकेबाज अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या या कार्याची चर्चा बीड शहरात आहे.

३१ वर्षांतील दुसरे एन्काउंटर
बीडमध्ये सन १९८३ मध्ये गुन्हे अन्वेषण विभागाचे फौजदार बाजीराव राठोड यांनी नेन्या पहिलवानचा पाठलाग करून घोडका राजुरी तलाव परिसरात एन्काउंटर केले होते. ३१ वर्षांनी धोंडराई येथील एन्काउंटर झाले.

शांतता ठेवा, माहिती द्या
बीड शहरातील नागरिकांनी शांतता बाळगावी. ज्यांना अशा प्रकारच्या गुन्हेगारांची माहिती आहे, त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी.
नवीनचंद्र रेड्डी, पोलिस अधीक्षक, बीड