आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याच्या अपेक्षा मंत्रिपदामुळे उंचावल्या, शेतीच्या विकासाचे ठोस निर्णय घ्यावे लागणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - काँग्रेसचे दिवंगत शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांनी सांभाळलेली मराठवाड्याची धुरा देशातील सत्तापरिवर्तनासोबतच आता भाजप नेते आणि बीडचे खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्यावर आली आहे. योगायोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये ग्रामविकासासारखे महत्त्वाचे खाते वाट्याला येण्याच्या शक्यतेने ग्रामीण विकासात उपेक्षित राहिलेल्या मराठवाड्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. पाटबंधारे प्रकल्प, वीज, पाणी, शेतीच्या विकासाचे ठोस निर्णय त्यांच्याकडून अपेक्षित आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसोबतच राज्यातून मंत्रिपदाची शपथ घेणार्‍या नेत्यांमध्ये बीडचे खासदार गोपीनाथ मुंडे यांचा समावेश झाल्याने बीड तसेच मराठवाड्यात आनंद व्यक्त करण्यात आला. बीडपासून भाजपला अनुकूल वातावरण तयार करून थेट राज्यात घोडदौड करून विरोधकांची दमछाक करणारे गोपीनाथ मुंडे यांची लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातच कोंडी करण्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आटोकाट प्रयत्न केला. महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांना बळ देत मुंडेंच्या विरोधात मैदानात उतरवले. परंतु भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व म्हणून जिल्ह्यातील जनतेवर असलेली छाप आणि मोदी लाट या बळावर गोपीनाथ मुंडे यांनी सलग दुसर्‍यांदा विजय मिळवला. मोदी लाटेमुळे केंद्रात भाजपने स्वबळावर सरकारही स्थापन केले. मोदींच्या गुडबुकमधील असल्याने मुंडेंना केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून नक्कीच गौरव होईल, अशी जिल्ह्यातील जनतेची अटकळ होती. जनतेच्या अपेक्षेप्रमाणे सोमवारी मोदींनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचाही 12व्या क्रमांकावर शपथविधी झाला. मुंडेंना ग्रामविकासाशी संबंधित चांगले खातेही मिळाले.

काय आहेत अपेक्षा..
शंकरराव, विलासरावांनंतर आता धुरा गोपीनाथरावांच्या खांद्यावर
केंद्रात काँग्रेसप्रणीत सरकारमध्ये गृहमंत्री असलेले शंकरराव चव्हाण, त्यानंतर ग्रामविकास, अवजड उद्योग अशी महत्त्वाची खाती सांभाळणारे मुंडेंचे सच्चे मित्र विलासराव देशमुख यांनी मराठवाड्याचे नेते अशी ओळख निर्माण केली. त्यांच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राहिलेले शिवराज पाटील चाकूरकर मात्र मराठवाड्यातील जनतेत मिसळले नाहीत. त्यामुळे केंद्रात आता भाजपप्रणीत लोकशाही आघाडी सरकार विराजमान झाले आणि भाजपचे राष्ट्रीय नेते असलेले गोपीनाथ मुंडे केंद्रात मंत्री झाले. चव्हाण, देशमुख यांच्यानंतर उपेक्षित मराठवाडा आता गोपीनाथ मुंडे यांच्याकडे मोठय़ा अपेक्षेने पाहत आहे.

खूप काही करण्यासारखे..
दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी ग्रामविकास खाते सांभाळले होते. खासदार गोपीनाथ मुंडे यांना चांगले खाते मिळालेले आहे. ग्रामविकासाशी संबंधित उपयोग व्हावा. शहराचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, मराठवाड्याचा आणि महाराष्ट्राचा विकास व्हावा. रेल्वेचे काम पूर्ण व्हावे. सुरेश धस, महसूल राज्यमंत्री.

>पाटबंधार्‍यांचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण व्हावेत, यातून शेतीपिकात आमूलाग्र बदल करता येतील.
>खेड्यापाड्यांत विजेच्या उपलब्धतेत सुधारणा व्हावी
>औद्योगिकीकरण जाहीर झाले तसे कृषी क्षेत्रातही माल एक्सोर्ट व्हावा, यासाठी दलालांचे अस्तित्व संपून शेती उत्पादनाचा पैसा थेट शेतकर्‍यांच्या हातात पडेल असा निर्णय घ्यावा
>याशिवाय बीड जिल्ह्याच्या अस्तित्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर-बीड- परळी लोहमार्गासोबतच सोलापूर - जळगाव रेल्वेचे काम हाती घेण्यात यावे, यातून बीडला जंक्शन होईल आणि रेल्वेमुळे अनेकांच्या हाताला रोजगार मिळेल.