आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ मुंडेंच्या जाण्याने ‘त्यांची’ चिंता वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लोकसभा निवडणुकीत तुम्ही पक्षाच्या कामाला लागा.. मी तुम्हाला विधानसभेत कसं न्यायचं ते बघतो. असा आश्वासक शब्द देऊन गोपीनाथ मुंडे यांनी अनेकांना कामाला लावले होते. मात्र, मुंडेंच अचानक गेल्यामुळे त्यांच्या शब्दाखातर राजकीय निर्णय घेतलेल्यांच्या पोटात काळजीने खड्डा पडला आहे. मुंडेंच्या अकाली जाण्यामुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

नांदेड जिल्ह्यात मुंडेंनी कंधारमधील अँड. मुक्तेश्वर धोंडगे यांना आमदारकीसाठी सहकार्याचे आश्वासन दिले होते. मुखेडच्या गोविंद राठोड यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये घेतले होते. त्यांनी ताकद लावून डी.बी. पाटलांना आघाडी मिळवून दिली. त्यामुळे ती जागा शिवसेनेकडून सोडवून घेऊन राठोडांना उभे करण्याचा मुंडेंचा मनसुबा होता.

लातूर जिल्ह्यात संभाजी पाटील निलंगेकरांना निलंग्यातून उभे करायचे की त्यांच्या मातोर्शी रूपाताईंना, याचा निर्णय मुंडे घेणार होते, तर लातूर ग्रामीण मतदारसंघात भाजपचे संभाव्य उमेदवार रमेश कराड केवळ मुंडेंच्याच जिवावर निवडणुकीला सामोरे जाणार होते. त्यांच्या जाण्याने सावलीच गेल्याची कराड यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. उदगीरच्या आमदारांनी लोकसभेत बंडाची भाषा केल्यामुळे टी. पी. मुंडे यांना उदगीरमधून उभे करण्याचा त्यांचा विचार होता.

अहमदपूरमध्ये अशोक केंद्रे, दिलीप देशमुख, बब्रुवान खंदाडे यांना फक्त मुंडेंच्या एका इशार्‍याची गरज होती. तसेच लातूर शहर मतदारसंघ भाजपला सोडवून घेण्यासाठीही मुंडेंकडे साकडे घालण्यात आले होते. सगळ्यात मोठे नुकसान झाले ते पाशा पटेलांचे. पाशा यांना विधान परिषदेवर आमदार केले होते. दुसर्‍यांदा त्यांची निवड होऊ शकली नव्हती; पण मुंडेनिष्ठ असलेल्या पाशा पटेलांवर केंद्रात सत्ता आल्यानंतर मोठी संधी मिळण्याची शक्यता होती.

उस्मानाबादमध्ये भूम-परंड्यातून शंकरराव बोरकर यांना महायुतीचे तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. लोकसभेला रोहन देशमुखांनी बंडखोरी केल्यामुळे ते सुभाष देशमुखांवर तसे नाराज होते. त्यामुळे त्यांना तुळजापूरमधून तिकीट मिळेल की नाही याची शंका होतीच. गडकरींनी सुभाष देशमुखांना कामाला लागा अशी सूचना केली असली, तरी मुंडेंशिवाय तुळजापूरातून विजय मिळवणे मुश्कील असल्याची जाणीव होती.

बीडमध्ये सुरेश धस, प्रकाश सोळुंके, अमरसिंह पंडित यांना आमदार करूनही ही मंडळी सोबत राहिली नाहीत. त्यामुळे मुंडेंनी नव्या लोकांना पुढे आणून त्यांना लोकप्रतिनिधी करण्याचा विडा उचलला होता. गेवराईचे लक्ष्मण पवार यांना तिकीट देण्याचे निश्चित होते. रमेश पोकळे, गंगाभीषण थावरे यांनाही चांगली संधी मिळण्याची अपेक्षा होती. आष्टीत भीमराव धोंडेंनी लोकसभेला केलेले सहकार्य लक्षात घेऊन त्यांना पुढे आणून धस यांना पाडण्याचा निर्णय झाला होता.

परभणी जिल्ह्यात गंगाखेडचे सीताराम घनदाट यांना गोपीनाथरावांकडून मदतीची अपेक्षा होती. मधुसूदन केंद्रे आणि रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात मुंडे मदत करणार याची त्यांना खात्री होती. तसेच राष्ट्रवादीच्या विरोधात काम केलेल्या सुरेश वरपूडकरांनाही मुंडेंची ऐनवेळी मदत झाली असती. काँग्रेसमध्ये कोंडी होत असलेल्या रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पाठीशीही मुंडेंच्या छुप्या पाठिंब्याची आस होती.

सोलापूर जिल्ह्यातही मुंडेंनी अनेक खटपटी केल्या होत्या. विजयसिंह मोहिते पाटील यांचे भाऊ प्रतापसिंहाना युतीच्या काळात मंत्री केले होते. आताच्या निवडणुकीत माढय़ामधून सदाभाऊ खोत यांना उभे केले होते. इथल्या महादेव जानकर यांच्या पाठीशी ताकद उभी करून त्यांना बारामतीत उभे केले होते. विधानसभेलाही जानकर बारामतीमधून किंवा आणखी एखाद्या सुरक्षित मतदारसंघातून उभे करून आमदार करणारच असा विडा मुंडेंनी उचलला होता. त्यांच्या जाण्याने सगळीच समीकरणे बदलली आहेत.