आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम महाराष्ट्रात अकरा जागा - गोपीनाथ मुंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - बीड जिल्ह्यात मला अडकवून ठेवण्याची भाषा राष्ट्रवादीचे चुलते-पुतणे करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात महायुती मिळून अकरा जागा लढवणार आहे. त्यामुळे कोण कोणाला अडकवून ठेवतं हे आगामी लोकसभा निवडणुकीत लक्षात येईल, असा टोला भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून लगावला. सोमवारी अंबाजोगाईत पत्रकार परिषदेत त्यांनी आघाडी सरकारवर तोफ डागली.

येथील जानकी मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळाव्यानंतर खासदार मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आठवडाभरात पश्चिम महाराष्ट्रातील दोन नेते भाजपत येणार असून 27 फेब्रुवारीला महायुतीची पहिली यादी जाहीर होणार आहे. महायुतीने पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना जाहीर केलेले आहे; पण काँग्रेसच्या प्रचार प्रमुखपदी राहुल की सोनिया गांधी हे निश्चित झाले नाही. पंतप्रधानपदाचे दावेदार कोण हेच गुलदस्त्यात आहे. राज्य आणि केंद्रातील कारभार असंतोष व चीड निर्माण करणारा आहे. त्यामुळे परिवर्तनाची लाट अटळ आहे, असा दावाही गोपीनाथ मुंडे यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादी फोडायची नाही
पत्रकारांच्या प्रश्नावर मुंडे म्हणाले, बीडमधील राष्ट्रवादी मला फोडायची नाही. कारण बर्‍याच जणांना मी जवळ करून पाहिलेले आहे. आता सामान्य कार्यकर्त्यांनाच नेतृत्वाची संधी मिळणार आहे.

माजी खासदार पाटील स्वगृही
अंबाजोगाईत सोमवारी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत नांदेडचे माजी खासदार डी. बी. पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश केला. 2004 ते 09 या काळात पाटील भाजपच्या उमेदवारीवर खासदार होते. अलीकडच्या वर्षापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. आता ते स्वगृही परतले आहेत.