आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या काळात एकही दंगल झाली नाही : मुंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज - मी राज्याचा गृहमंत्री असताना एकही दंगल होऊ दिली नाही. कुठल्याही मुस्लिमावर अन्याय होऊ दिला नाही; पण काँग्रेस -राष्ट्रवादीच्या राज्यात 47 दंगली झाल्या.हे सरकार दलितांसह मुस्लिमविरोधी आहे. त्यामुळे मुस्लिमांना बरोबर घेऊन त्यांचा विकास करणार आहे, असे प्रतिपादन खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केले.

शहरातील हनुमान मंदिर परिसरात बुधवारी संध्याकाळी पालिका गटनेते हारुण इनामदार (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी खासदार मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

खासदार मुंडे म्हणाले, मुस्लिमांबाबत उर्दू भाषेचा प्रश्न किंवा त्यांच्यातील काही विशिष्ट जातींना ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी यापूर्वीच मी संसदेत केली आहे. पूर्वी हज यात्रेसाठी जाणार्‍या मुस्लिमबांधवांना बोटीतून जावे लागत होते; पण तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी खास विमानाची व्यवस्था केली. सध्याचे सरकार मुस्लिमविरोधी आहे.

मौलाना आझाद मंडळाला 500 कोटींचे अर्थसाहाय्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तुटपुंजेअर्थसाहाय्य देऊन दिशाभूल केली जात आहे. जिल्ह्यातील 48 हजार 935 मुस्लिम विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी पाच हजार 444 अर्ज रद्द करण्यात आले. केवळ आठ हजार 542 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली, असेही मुंडे म्हणाले. जाहीर सभेपूर्वी केज शहरातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढली. यासभेला केज तालुक्यातून भाजप कार्यकर्ते आले होते. सभेत राष्ट्रवादीच्या नगरसेविका छाया हजारे, बीडचे नवनाथ शिराळे, पूर्णा येथील राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष मोहन मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यापुढे राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रवेश नाही
आजपर्यंत माझ्याकडे बेइमान लोकांची फौज होती. ती फौज जमा करून मी फसलो. जे बेइमान होते, ते राष्ट्रवादीत गेले. जे इनामदार आहेत, ते भाजपमध्ये आले. राष्ट्रवादीतील मोठे नेते पोकळवासा असून यापुढे त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणार नाही. सामान्यांना पक्षात प्रवेश देऊन मोठे करण्यात येईल, असेही खासदार गोपीनाथ मुंडे यांनी या वेळी सांगितले.