आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणमध्ये आज गोपीनाथ मुंडेंचा दशक्रिया विधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा दशक्रिया विधी गुरुवार, 12 जून रोजी सकाळी 9 वाजता गोदावरी नदीकाठच्या कृष्णकमल तीर्थ येथे होणार आहे. या विधीसाठी दोन लाख कार्यकर्ते येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने 1800 पेक्षा अधिक पोलिस फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

सकाळी 8.30 वाजता स्व. मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञाताई मुंडे, आमदार पंकजा पालवे, प्रीतम खाडे, यशर्शी मुंडे तसेच महाजन परिवारातील प्रकाश महाजन, बहीण सरस्वती कराड यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर सकाळी 9 वाजता दशक्रिया विधीस अनंतशास्त्री खरे गुरुजी व त्यांचे सहकारी विधिवत सुरुवात करणार आहेत. याप्रसंगी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, आमदार भाऊसाहेब फुंडकर, माधव भंडारी यांच्यासह भाजपच्या अनेक आमदारांसह मराठवाड्यातील व राज्यभरातून दोन लाख कार्यकर्ते येण्याचा अंदाज पोलिस प्रशासनाने वर्तवला आहे.

हेलिपॅडची व्यवस्था
दशक्रिया विधीसाठी केंद्रीय मंत्र्यांसह राज्यातील भाजपचे मान्यवर हेलिकॉप्टरने येणार असल्याने एमआयडीसी परिसरात हेलिपॅड असले तरी एकाच जागी ही सोय करण्यात आल्याने गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


तीन तासांचा विधी :
नंतशास्त्री खरे गुरुजी व त्यांचे सहकारी ब्रह्मवृंद विधी करणार असून हा विधी तीन तास चालेल, असे सांगण्यात आले आहे.

चार ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था : शहरातील नगरपालिकेच्या वाहनतळावर व्हीआयपींच्या वाहनांची सोय करण्यात आली असून, अन्य वाहनांसाठी जांभूळबन, उद्यान रोडवरील मैदान, स्टेडियम या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

चोख पोलिस बंदोबस्त
दशक्रिया विधीसाठी जवळपास दोन लाख कार्यकर्ते येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने पोलिस प्रशासनातर्फे संपूर्ण पैठण शहरभर जागोजागी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, यामध्ये 5 पोलिस अधीक्षक, 12 पोलिस उपअधीक्षक, 25 पोलिस निरीक्षक, 4 राज्य राखीव बलाच्या तुकड्या व 1700 पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सी.पी.काकडे यांनी दिली.

दशक्रिया विधी
दोन लाख कार्यकर्ते येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने 1800 पेक्षा अधिक पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आले आहेत.