आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाथनगरीत लोकनाथांच्या अस्थींचे विसर्जन; प्रेमापोटी चाहत्यांनी केले मुंडण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील असंख्य कार्यकर्त्यांचे लाडके नेते तथा केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा दशक्रिया विधी गुरुवारी पैठणमध्ये पार पडला. आपल्या लाडक्या नेत्याच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते पैठणमध्ये दाखल झाले होते.
गुरुवारी सकाळी 8.30 वाजता मुंडे कुटुंबीय गोदाकाठी दाखल झाले. सकाळी 9 वाजता दशक्रियाविधीस प्रारंभ झाला. अनंत खरे शास्त्री व त्यांच्या सहकार्‍यांनी तीन तासांचा हा विधी पार पाडला. विधी संपताच आमदार पंकजा मुंडे-पालवे, प्रीतम गौरव खाडे, यशर्शी गोपीनाथ मुंडे यांनी पिंडदान करत अस्थिकलशाचे गोदावरीत विसर्जन केले. याप्रसंगी गोपीनाथ मुंडेंच्या आई लिंबाबाई, पत्नी प्रज्ञाताई, प्रकाश महाजन, खासदार पूनम महाजन, राहुल महाजन, आकाश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह पंडितअण्णा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती.

फडणवीस, तावडेंना उशीर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना गोपीनाथ मुंडेंच्या अंत्यविधीच्या वेळी कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. हे पाहता गुरुवारी देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे नेते दुपारी 12 वाजता पैठण शहरात दाखल झाले. या सर्वांनी मुंडेंच्या अस्थींचे दर्शन घेत लगेच परतीची वाट धरली.

पंडितअण्णा, धनंजय यांना संरक्षण
दशक्रिया विधी सुरू होताच काही वेळाने मुंडेंचे थोरले बंधू पंडितअण्णा व पुतणे आमदार धनंजय दाखल झाले. विधीमध्ये सहभागी न होता ते कुटुंबीयांबरोबर पोलिस संरक्षणात मंडपात होते. काही वेळानंतर आमदार धनंजय यांनी मुंडण केले. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनीही मुंडण करून घेत आपल्या लाडक्या नेत्याविषयी असलेल्या प्रेमाचा प्रत्यय दिला. दरम्यान, परळीत मुंडेंच्या अंत्यविधीच्या वेळेस जमावाने घातलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पैठण शहरात पोलिस प्रशासनाने जागोजागी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मान्यवरांची उपस्थिती
जनसामान्यांचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या दशक्रिया विधीसाठी सामान्य कार्यकर्त्यांसह भाजप व अन्य पक्षातीलनेते मंडळींनी आवर्जून उपस्थिती लावली. पांडुरंग फुंडकर, विनायक मेटे, खासदार गिरीश महाजन, महादेव जानकर, राम शिंदे, माधुरी मिसाळ, प्रकाश शेंडगे, शिवाजी कर्डिले, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी मंत्री हरिभाऊ बागडे, जयसिंगराव गायकवाड, रेखा कुलकर्णी, आबा बरकसे, अशोक डोणगावकर, डॉ. भागवत कराड, डॉ. पंडित किल्लारीकर, माजी आमदार संदिपान भुमरे आदी उपस्थित होते.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, पाणावलेले डोळे अन्..