आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde, Suresh Dhas News In Divya Marathi

बीडमध्ये ‘व्होट बँक’ काबीज करण्यासाठी गोपीनाथ मुंडे- सुरेश धस यांच्यात स्पर्धा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - राज्याचे लक्ष वेधून घेणार्‍या बीड मतदार संघातील लढत भाजपचे ज्येष्ठ नेते व उमेदवार गोपीनाथ मुंडे व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. मुंडेंना मतदारसंघातच खिळवून ठेवण्यात राष्ट्रवादी काही प्रमाणात यशस्वी झाली तर राष्ट्रवादीचे एक-एक शिलेदार आपल्या तंबूत आणत मुंडेंनीही पवारांना काटशह दिला. मात्र, विकासाच्या मुद्द्यावर मैदान माजवण्याऐवजी या निवडणुकीच्या प्रचारातही जातीपातीचाच मुद्दा अग्रभागी राहिला, हे नाकारून चालणार नाही.

बीड मतदारसंघात सुमारे 39 उमेदवार असले खरी लढत महायुतीचे उमेदवार गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार राज्यमंत्री सुरेश धस यांच्यातच होत आहे. गेल्या पाच वर्षांत मुंडे यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चांगलीच कोंडी केली. मात्र, मागील वेळी प्रचारात सारथ्य करणारे पुतणे, आमदार धनंजय मुंडे आणि आमदार अमरसिंह पंडित हे एक वर्षापूर्वी मुंडेंची साथ सोडून राष्ट्रवादीच्या गोटात गेल्याने मुंडेंना मोठा धक्का बसला. मुंडेंकडूनच राजकीय बाळकडू घेतलेल्या सुरेश धस यांनाच पवारांनी रिंगणात उतरवल्याने मुंडेंची आणखीच कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. काहीही झाले तरी यंदा मुंडेंचा पराभव करायचाच, या इर्षेने दस्तुरखुद्द शरद पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत दोन्ही कॉँग्रेसचे सर्व गट- तट एकत्र आणण्याचा प्रयत्नही केला. त्यातच नेहमी मुंडेंना मॅनेज होणार्‍या स्वपक्षीय नेत्यांना अजित पवारांनी थेट धमकी दिल्याने यंदा दगाफटका होणार नसल्याचा राष्ट्रवादीला विश्वास वाटतो.

दुसरीकडे, पवारांचे आव्हान स्वीकारत मुंडे व मुलगी पंकजा पालवे या बापलेकीने लढाई हाती घेतली. मुंडेंनी एकेक करत राष्ट्रवादीतील तीन माजी आणि एक विद्यमान आमदार भाजपत आणले आणि राष्ट्रवादीसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक जटील होत गेली. त्यातच जाती-पातीच्या प्रचारावर दोन्ही गटांकडून भर दिला जात आहे.

गोपीनाथ मुंडे
- थेट लोकांना बोलतं करण्याचा प्रयत्न. मतदारांनाच प्रश्न विचारून स्पर्धक, सरकारच्या अकार्यक्षमतेवर श्रोत्यांकडूनच शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करतात.
- विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत सभेत सवाल उपस्थित करून आरोप कसे चुकीचे हे श्रोत्यांकडूनच वदवून घेतात.
- प्रतिस्पर्ध्यांच्या उणिवांवर बोट ठेवून मतदारांत आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न.
- वक्तृत्व शैलीमुळे मोठ्या प्रमाणात सभांना गर्दी वाढलेली दिसते.
- मागील राजकारणात झालेल्या चुकांची कबुली जाहीर सभेत देत स्वत:तील प्रांजळपणाही प्रस्थापित करतात.

सुरेश धस
- मुंडे यांचे बारा वर्षांहून अधिक काळ सहकारी राहिल्याचे सांगत मुंडे किती खोटारडे आहेत, हे श्रोत्यांवर बिंबवतात.
- प्रतिस्पर्ध्यांच्या चुका प्रभावीपणे मांडून श्रोत्यांमध्ये विरोधी उमेदवाराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतात.
- आपण आणि आपल्या गटाने केलेल्या चुकांनाही प्रतिस्पर्धी उमेदवार जबाबदार असल्याचा भास निर्माण केला जातो.
- आपल्या भाषणात जोडलेल्या विनोदी झालरीने श्रोत्यांमध्ये उत्साह आणि विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
- ग्रामीण जनतेशी नाळ जोडली गेल्याचे उदाहरणातून दाखवून देत मतदारांवर प्रभाव निर्माण करतात.

मतदार काय म्हणतात..
अंदाज बांधणे कठीण
ही निवडणूक मुद्द्यांवर गाजलीच नाही. आरोप प्रत्यारोप, तुम्ही काय केले, दाखवा तुमची कामे असे प्रचारात सांगत सुटले. यातून सामान्यांना प्रश्नाचे उत्तर मिळते. कोणीच काही केले नाही. निवडणुकीत दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने या वेळी भरपूर मतदान झाले तरी अंदाज बांधता येणे अशक्य आहे. - डॉ. अनिल बारकुल, वैद्यकीय व्यावसायिक.

कृषी धोरणाचा विसर
निवडणुका येतात व जातात, सत्ता नेहमीच बदलत असते. मात्र, सेंद्रिय शेती धोरणाची सक्ती कोणीच करत नाही, ही शोकांतिका आहे. निवडणुकीच्या प्रचारातील भाषणांमध्ये भ्रष्टाचार, महागाई, आरोप-प्रत्यारोप होतात, परंतु शेतकर्‍यांच्या शेती मालाविषयी काहीच उहापोह होत नाही. ज्या कोणाचे सरकार येईल, त्यांनी सेंद्रिय शेती व शेतीसाठी पुढार्‍यांनी बदल करणे गरजेचे आहे. - शिवराम घोडके, कृषिभूषण शेतकरी

प्रचाराचा दर्जा घसरला
आपल्याच पक्षातील सहकार्‍यांचा विश्वास संपादन करण्यात आलेले अपयश, हीच सत्ताधार्‍यांची मोठी उणीव आहे. केवळ विरोधी उमेदवाराकडे यंत्रणा नसल्याची संधी साधल्याचा केलेला प्रयत्न होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे लोकसभेची निवडणूक असताना ग्रामीण स्तरावरील प्रश्नाला खासदारास जबाबदार धरल्याने प्रचाराचा दर्जा घसरला. निवडणुकीत राष्ट्रीय प्रश्न बाजूलाच पडले. ही निवडणूक व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपातच गुंतून पडल्याने गल्लीतील भांडणाचे स्वरूप आले. त्याला उत्तर देण्यासाठी मतदारांनीच ही निवडणूक हाती घेतलीय.
नरेंद्र कांकरिया, संपादक, दै. संकेत