आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde Wankat Munde In Hospital Pandit Munde In Ncp

धाकटा रुग्णालयात, तर थोरला राष्ट्रवादीत!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - एकीकडे लहान भाऊ मृत्यूशी झुंज देतोय तर दुसरीकडे मोठा भाऊ आपल्या मुलासह विरोधकांच्या गोटात जातोय...अशा विचित्र परिस्थितीत बुधवारची रात्र भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी जागून काढली. गुरुवारी सकाळी त्यांच्या बीड आणि गेवराई येथे सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी तिकडे जायचे टाळून गुरुवारचा दिवस प्लॅनेट रुग्णालयातच घालवला.
कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास ते औसा रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात विश्रांतीसाठी गेले. गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ते पुन्हा रुग्णालयात आले. त्यांनी बंधूवर उपचार करणाºया डॉक्टरांशी चर्चा करून बंधूंची भेट घेतली. त्यांच्यासोबत चार शब्द बोलून ते पत्रकारांना सामोरे गेले.

व्यंकटरावांच्या प्रकृतीची माहिती त्यांनी दिली. आपण रात्रीपासून बंधूला मुंबईला हलवण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्सही मागवली होती. मात्र मुंबई आणि लातूर या दोन्ही ठिकाणच्या डॉक्टरांनी नकार दिल्यामुळे त्यांच्यावर येथेच उपचार करण्याचा निर्णय घेतल्याचे मुंडे यांनी सांगितले. एककीडे मृत्यूशी झुंज देणारा लहान भाऊ आणि दुसरीकडे इतक्या वर्षाची साथ
सोडून विरोधकांच्या गोटात जाणारा भाऊ अशा परिस्थितीत तुमच्या भावना काय आहेत असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपण नेते असलो तरी प्रथम एक माणूस आहोत. माणूस म्हटलं की आयुष्यात चढ-उतार येतातच. राजकीय चढ-उतारांची पर्वा करीत नाही. कौटुंबिक स्थिती मात्र क्लेशकारक आहे, असे मुंडे म्हणाले.
गमावले की कमावले
धनंजय यांनी साथ सोडल्यामुळे त्यांचा भविष्यात फायदा होईल की तोटा या प्रश्नावर गोपीनाथ मुंडे यांनी थेट भाष्य केले नाही. मात्र,
भाजपमध्ये असताना धनंजय बीड जिल्ह परिषदेच्या भाजपच्या साठ जागांवर कोणाला उभे करायचे याचा निर्णय घ्यायचे..तेच धनंजय आता राष्ट्रवादीकडे आठ तरी जागा द्या अशी मागणी करताहेत. त्यामुळे त्यांनी तिकडे जाऊन काय कमावले आणि काय गमावले याचा विचार जनताच करणार आहे असे उत्तर दिले.

प्रकृती कशी आहे....कोणाची...
व्यंकटराव यांना लातूरला दाखल केल्याचे समजताच मुंडे कुटुंबातील ज्येष्ठ बंधू पंडितअण्णा आणि त्यांचे चिरंजीव आमदार धनंजय हे दोघे रुग्णालयात आले. त्यांनी व्यंकटराव यांची विचारपूस केली. त्यावेळी गोपीनाथ मुंडे डॉक्टरांच्या कक्षात बसलेले होते. मात्र त्यांनी परस्परांची भेट घेतली नाही. पंडितअण्णा रुग्णालयाबाहेर पडताच पत्रकारांनी त्यांना प्रकृती कशी आहे असा प्रश्न केला. त्यावर पंडितअण्णांनी कोणाची प्रकृती असा प्रतिप्रश्न केला... त्यामुळे पत्रकारांसह उपस्थितांनाही आश्चर्याचा धक्का बसला.