आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde Welfare Corporation For Sugar Cane Labourers CM Fadanvis

ऊसतोड कामगारांसाठी गाेपीनाथ मुंडे कल्याण मंडळ, मुख्‍यमंत्री फडणवीस यांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी/नांदेड - राज्यातील ऊसतोड मजुरांसाठी माथाडी कामगारांच्या धर्तीवर लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची स्थापना केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित गोपीनाथगड स्मारकाच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, ऊसतोड मजुरांना न्याय मिळण्यासाठी मुंडेंनी संघर्ष केला. त्यामुळे आमच्या सरकारने त्यांच्या नावाने कल्याण मंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज विधानसभेत जाहीर केला. मला राजकारणातील सर्वाेच्च पद त्यांच्यामुळे मिळाले. विधानसभेतील कामकाज कसे करायचे, हे त्यांनी मला शिकवले. त्यांनी केलेल्या संघर्षामुळे राज्यात सत्तापरिवर्तन होऊन युती सरकार सत्तेवर आले. ते असते तर राज्याच्या प्रगतीला चालना मिळाली असती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या सध्या काम करत आहेत. या वेळी स्मारकाच्या भूमिपूजनास एक लाख समर्थक हजर होते.

शेतक-यांना शाश्वत शेती करता आली पाहिजे : देवेंद्र फडणवीस
पाच वर्षांत ८ हजार कोटी रुपये मदतीवर खर्च केले. केवळ २ हजार कोटी रुपये शेतीविकासाकरिता खर्च केले. त्यामुळेच दुष्काळ पाचवीला पुजला आहे. शेतक-याला शाश्वत शेती करता आली पाहिजे. सिंचनाची शाश्वती असली पाहिजे. यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री सांगितले.

परळी येथून नागपूरला जाण्यासाठी ते अल्पकाळ विमानतळावर आले असताना पत्रकारांशी बोलत होते. सरकारने जे पॅकेज घोषित केले त्याचा मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांना मोठा फायदा होणार आहे. मराठवाड्यातील शेतक-यांना या परिस्थितीतून पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. शेतक-यांना सक्षम करण्यावर व शेती विकासावर
सरकारचा भर आहे. शेतक-यांना हजार दोन-हजार रुपयांची मदत करून उपयोग नाही. पैसे तर दिले पाहिजेतच; पण त्यासोबत त्याला शाश्वत शेती करता आली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शिक्षणमंत्री विनोद तावडे व सचिव अश्विनी भिडे यांच्या नावे चिठ्ठी लिहून अंशकालीन शिक्षक रमिजोद्दीन याने आत्महत्या केल्याच्या घटनेची माहिती घेऊन त्यावर बोलेन, असेही त्यांनी सांगितले.