बीड - पत्रकारितेचा उपयोग समाज प्रबोधनासाठी झाला पाहिजे. राज्यसत्तेला वठणीवर आणण्याचे काम पत्रकारच करतात. त्यामुळे पत्रकारांना सुरक्षा देण्यासाठी सर्व पत्रकारांशी चर्चा करून कायद्यासाठी तरतूद करण्यात येईल. नुसती शारीरिक नव्हे, तर सामाजिक सुरक्षा देण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात गुरुवारी बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित स्व. स. मा. गर्गे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना गौरवताना मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी मंचावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार रजनीताई पाटील, डॉ. प्रीतम मुंडे, आमदार विनायक मेटे, भीमराव धोंडे, आर. टी. देशमुख, संगीता ठोंबरे, अॅड. लक्ष्मण पवार, जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष मानूरकर, पालिका गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडित, गोविंद घोळवे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यात भाजपला सत्तेच्या सिंहासनापर्यंत नेण्याचा वाटा मुंडे साहेबांनी उचलला होता. ते आज आमच्यात नाहीत हे आमच्यासाठी वेदनादायी आहे. स. मा. गर्गे यांच्याविषयी मी काय बोलणार? गोपीनाथ मुंडे व विलासराव देशमुख यांनी गर्गे यांच्याबद्दल काय भावना व्यक्त केल्या ते मी सादर करण्यात आलेल्या चित्रफितीतून पाहिले आहे. गर्गे हे एक समाज परिवर्तन करणारे पत्रकार होते. त्यांच्या नावाने खांडेकर यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. म्हणजे योग्य व्यक्तीची पुरस्कारासाठी निवड केली आहे.
रक्कम गुणवंत विद्यार्थ्यांसाठी
संपादक राजीव खांडेकर यांनी पुरस्काराची मिळालेली एक लाख रुपयांची रक्कम जिल्हा पत्रकार संघाला परत केली. या रकमेत स्वत:चे दहा हजार रुपये जमा करून खांडेकर यांच्या बीड येथील सासू व सासरे यांच्या स्मरणार्थ दहावीत मेरिट लिस्टमध्ये बीड जिल्ह्यातून प्रथम, द्वितीय येणा-या विद्यार्थ्यांना बक्षीस व पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे, असे खांडेकर यांनी सांगितले.
दिलासा देणारा पुरस्कार
स.मा.गर्गे यांंच्या नावाने मला जो पुरस्कार देण्यात आला आहे, तो दिलासा देणारा आहे. माझ्यासारख्या काही वर्षे पत्रकारितेत काम करणा-या पत्रकाराला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नाट्यक्षेत्रात जसा विष्णुदास भावे पुरस्कार आहे, अगदी त्याप्रमाणेच गर्गे यांच्या नावाने मला देण्यात आलेल्या पुरस्काराची उंची आहे.
राजीव खांडेकर, पुरस्कारप्राप्त संपादक