माजलगाव- जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने माजलगाव बाजार समितीला पत्र पाठवून २५ क्विंटलपेक्षा अधिक तूर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे मागवली असून बाजार समितीने शंभरवर शेतकऱ्यांची नावे उपनिबंधकांना कळवली आहेत. त्यामुळे हे शंभर शेतकरी चौकशीच्या फेऱ्यात सापडणार आहेत. शिवाय या शेतकऱ्यांच्या आडून तूर विक्री करणाऱ्या खासगी व्यापाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.
बीडच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने येथील माजलगाव बाजार समितीकडून तूर विक्रीचा अहवाल मागवला आहे. कोणत्या शेतकऱ्याने किती तूर विक्री केली, पेरा कमी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तूर विक्री कशी केली. याबाबतची माहिती देणारा अहवाल माजलगाव बाजार समिती प्रशासनाकडे उपनिबंधकांनी मागवला होता.
समितीने तातडीने अहवाल तयार करून २५ क्विंटलपेक्षा अधिक तूर विक्री करणाऱ्या शंभर शेतकऱ्यांनी नावे जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवली आहेत. राज्यात अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आडून तूर विक्री केल्याचा संशय बळावल्याने कृषी मंत्रालयाचे मुख्य सचिव विजयकुमार यांनी खासगी खरेदीसह मोठ्या प्रमाणात तूर विक्री करणारांचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागवला आहे.
जिल्हा उपनिबंधकांनी माजलगाव बाजार समितीला पत्र पाठवून २५ क्विंटलपेक्षा अधिक तूर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागवली होती. माजलगाव बाजार समितीने अशा प्रकारे तूर विक्री करणाऱ्या शंभर शेतकऱ्यांची यादी व तपशीलवार माहिती जिल्हा उपनिबंधकांना पाठवली असून आता शंभर शेतकरी सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. शंभर शेतकऱ्यांपैकी बऱ्याच शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर तुरीचा पेरा कमी असतानासुद्धा त्यांच्या नावावर तुरीची जास्त विक्री झाली आहे.
हंगामात ८० हजार क्विंटल तूर खरेदी
माजलगाव येथील बाजार समितीच्या टीएमसी केंद्रावर नाफेडच्या वतीने या हंगामात ४० कोटी रुपयांची ८० हजार क्विंटल तूर खरेदी झाली होती. खरेदी केलेल्या तुरीपैकी ४० हजार क्विंटल तूर माजलगाव येथील वखार महामंडळात ठेवण्यात आली. उर्वरित ४० हजार क्विंटल तूर मानवत, औरंगाबाद येथील गोदामात पाठवण्यात आली आहे.
परजिल्ह्यातूनही तूर आली
माजलगाव येथील बाजार समितीच्या टीएमसी केंद्रावर शेतकऱ्यांसाठी सोयीसुविधा चांगल्या असल्याने बीड जिल्ह्यासह परभणी, जालना जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनीही तूर विक्रीस आणली होती.
पुढील आदेश आल्यानंतर गुन्हे
हमी भावापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करणारे व्यापारी, तूर विक्री करणारे शंभर शेतकरी व खासगी खरेदीचा तेरा हजार क्विंटलचा तपशील शासनास सादर केला आहे. पुढील आदेश येताच दोषींवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
- डी.बी.फुके ,सचिव, बाजार समिती, माजलगाव
तूर विक्रीचा काय आहे प्रकार?
बाजार समितीचे आजी माजी संचालक व त्यांच्या नातेवाइकांनी राजकीय दबाव आणत हंगामात तूर विक्रीसाठी नडलेल्या शेतकऱ्यांची तूर चार हजार रुपये क्विंटल दराने खरेदी करत तीच तूर येथील बाजार समितीच्या केंद्रावर विक्री केली. त्यासाठी शेतकऱ्यांचा सातबारा वापरून लाखो रुपयांचा नफा कमवला आहे. तूर पिकवणारा शेतकरी आर्थिक अडचणीमुळे भरडला गेला असून नफेखोर व्यापारी मात्र मालामाल झाले.