नांदेड - निवडणुकीच्या तोंडावर सरकारने जाहीर केलेल्या साडेदहा हजार कोटी रुपयांच्या योजनांना आर्थिक पाठबळ नाही. त्यामुळे या योजनांची अंमलबजावणी होणार नाही. मात्र, नागरिकही सुज्ञ आहेत. सरकारची फसवेगिरी त्यांच्यात लक्षात येईल, अशी टीका भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी शनिवारी येथे केली.
माळाकोळी येथील सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन व शहरातील एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी मुंडे येथे आले होते. महायुतीचे जागावाटप मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल. टोलमुक्त महाराष्ट्र ही महायुतीची घोषणा आहे. महायुती सत्तेवर आल्यानंतर राज्य टोलमुक्त करून दाखवू. स्वतंत्र तेलंगणाला भाजपचा पाठिंबा असून सरकारने विधेयक संसदेत मांडल्यावर भाजपचे सदस्य त्याला पाठिंबा देतील, असेही त्यांनी सांगितले. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत टोलमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना शक्य नसल्याचे म्हटले होते. मुंडेंनी नेमकी त्याविरुद्ध भूमिका घेतली आहे.
माजी खासदार स्वगृही?
वर्षभरापूर्वीच राष्ट्रवादीत गेलेले डी. बी. पाटील भाजपमध्ये परततील, असे संकेत मुंडे यांच्या दौर्यात मिळाले. माळाकोळी येथील कार्यक्रमात डी. बी. पाटील मुंडे यांच्या व्यासपीठावर होते. तसेच शहरात पत्रकारांशी बोलताना डी. बी. पाटील माझ्या संपर्कात आहेत, असे मुंडे यांनी सांगितले.