आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Governor C. Vidyasagar Rao On Monday In Osmanabad

साडेपाच तासांच्या दौ-यात अर्धा तास दुष्काळ पाहणी, 31किलोमीटरसाठी तीन हेलिपॅडची व्यवस्था

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- घटनात्मक विशेष दर्जा असलेले पद म्हणून राज्यपालपदाला महत्त्व आहे. राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव सोमवारी (दि. 5) जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. जिल्ह्यात ते साडेपाच तास थांबणार असून त्यापैकी अर्धा तास (30 मिनिटे) दुष्काळी भागाची पाहणी व अर्धा तास अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
उर्वरित साडेचार तासांत तुळजाभवानीच्या दर्शनासह टाटा सामाजिक संस्था व यमगरवाडी येथील खासगी संस्थांना भेटी देणार आहेत. विशेष म्हणजे वडगाव ते तुळजापूर व तेथून यमगरवाडी असे एकूण ३१ किलोमीटर अंतर कापण्यासाठी हेलिकॉप्टरने प्रवास करणार आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तीन हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आत्मत्येचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे आजवरच्या कालखंडापैकी या वर्षी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. या वर्षी ७० शेतक-यांनी जीवनयात्रा संपवल्याची नोंद शासन दरबारी करण्यात आली आहे. अपु-या पावसामुळे खरिपासह रब्बी हंगाम वाया गेला. चाराटंचाईसह पाण्याची टंचाई भेडसावत आहे. जिल्ह्यात सर्वत्र हीच स्थिती आहे. परंतु प्रशासकीय पातळीवरून खरीप व रब्बी हंगाम अशी वर्गवारी करून जिल्ह्यातील ७३७ पैकी केवळ ३८१ गावांत टंचाई जाहीर केलेली आहे. त्यामुळे उर्वरित गावांवर अन्याय झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी जिल्हावासीयांची मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या दौ-याला विशेष महत्त्व मानले जाते.
योजनेचा फज्जा
दुष्काळामुळे जिल्हा होरपळून निघत आहे.त्यातच जिल्ह्यात शतकोटी वृक्षलागवड योजनेचा पुरता फज्जा उडालेला आहे. त्यातच राज्यपाल दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येणार असल्याने त्यांना परिसर पाहून दाहकता जाणवणे आवश्यक आहे, परंतु तुळजापूर पालिकेने राज्यपालांच्या मार्गावर खास पुणे येथून दहा फूट उंचीची दीड हजार शोभिवंत झाडे खरेदी करून हिरवळीचा साज देण्याचा प्रयत्न केला आहे.
तुळजापुरात आढावा बैठक
राज्यपाल राव तुळजापूर येथील सर्किट हाऊसमध्ये दुपारी १.४५ ते २.१५ वाजेपर्यंत जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी २.४५. ते ३.४५ पर्यंत संस्थेच्या राष्ट्रीय ग्रामीण युवा महोत्सवाच्या समारोप समारंभास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.

दौ-यात होतो अनाठायी खर्च
लांबपल्ल्याचे अंतर कापण्यासाठी हवाई प्रवास आवश्यक आहे. एका दौऱ्यासाठी तीन ठिकणी हेलिपॅड तयार करून यावर अनाठायी खर्च करणे अयोग्य आहे. याला शेतकरी संघटनेचा विरोध आहे.'' सयाजीराव देशमुख, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना.