आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीधर निवडणूक मोर्चेबांधणीस वेग; मोदीलाटेचा परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर होऊ घातलेल्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होण्याला सज्ज झालेल्या भाजपमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपचे प्रदेश संघटनमंत्री प्रवीण घुगे आणि भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह प्रा. सतीश पत्की यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे.

एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघात माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी दोनदा, तर माजी आमदार र्शीकांत जोशी यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी भाजपचे र्शीकांत जोशी यांचा पराभव करून भाजपची मक्तेदारी मोडीत काढली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघात सुमारे तीन लाख 68 हजार 385 मतदार आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देशभरात मोदी लाटेने झपाटून टाकले. या निवडणुकी पाठोपाठ मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विद्यमान आमदार सतीश चव्हाण हेच मैदानात येणार आहेत. मोदी लाटेवर स्वार होऊन सहज निवडून येण्यासाठी मात्र भाजपमध्येच उमेदवारीसाठी स्पर्धा लागली आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी भाजपमध्ये प्रवीण घुगे, प्रा. सतीश पत्की, विजया रहाटकर, डॉ. शिरीष बोराळकर यांची नावे चर्चेत होती. मात्र, भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही.

जिल्हानिहाय मतदारांची संख्या
औरंगाबाद 1,07,029
जालना 24,443
बीड 59,470
परभणी 31,202
हिंगोली 11,316
उस्मानाबाद 39,814
लातूर 51,773
नांदेड 43,338
एकूण मतदार 3,68,385