आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुका निर्भयपणे पार पाडा, आयुक्त सहारिया यांचे निर्देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- ग्रामपंचायत निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी चोख कायदा व सुव्यवस्था राखावी, असे निर्देश शुक्रवारी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिले. नियोजन भवनात त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेतला. या वेळी अपर गृहसचिव के. पी. बक्षी, पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी उपस्थित होते.

जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ६४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होत आहेत. रविवार, १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मंगळवार, ३ रोजी मतमोजणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा, विधानसभा निवडणुकीसारख्याच निर्भयपणे व मुक्त वातावरणात झाल्या पाहिजेत. राज्य निवडणूक आयोगालाही भारत निवडणूक आयोगाएवढेच समान अधिकार आहेत. यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे, अशीही माहिती सहारिया यांनी बैठकीत दिली. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना गृहसचिव बक्षी यांनी केली. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना प्रलोभित करणाऱ्या बाबींवर कडक कारवाई केली जाईल. मतदानाच्या दिवशी मतदारांची अवैधरीत्या वाहतूक करण्याची बाब निदर्शनाला आल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. निवडणूक भयमुक्त वातावरणात होण्यासाठी पोलिस मित्र संकल्पना राबवून सर्वच घटकांच्या सहकार्याने निवडणुका शांततेत पार पाडाव्यात, असे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी बैठकीत सांगितले. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २ हजार ५६ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. त्यातील १२० मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. मतदारांची संख्या ८ लाख ८४ हजार ९८५ आहे. १८५ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.