आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gramsevak Strike Issue Effect On Work In Jalana City

ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन - महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी यांच्या वेतनत्रुटी दूर न झाल्यामुळे काम राज्यभर बंद आंदोलन सुरूकरण्यात आले आहे. त्यामुळे भोकरदन तालुक्यातील 103 ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झाले आहे.

भोकरदन तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावून किल्ल्या गटविकास अधिकारी राजेंद्र लोखंडे यांच्याकडे जमा केल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील 103 ग्रामपंचायतींचा कारभार बंद पडला आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात कंत्राटी ग्रामसेवकही काम बंद करून सहभागी झाले आहेत. जुलै महिना उजाडला तरी पाऊस नसल्याने तालुक्यात दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असल्याने गावात पाण्याचे नियोजन करण्यास अडचणी येत आहेत.
परिणामी ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी दूरवर भटकंतंी करण्याची वेळ आली आहे. ग्रामसेवक संपावर असल्याने गावोगावचा आढावा, ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीकडून लागणारे दाखले, प्रमाणपत्र बंद झाले आहेत. त्यामुळे सर्वांचीच कामे खोळंबली आहेत. भोकरदन तालुका ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष पांडुरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सर्व ग्रामसेवकांनी गटविकास अधिका -यांना निवेदन देऊन ग्रामपंचायत कार्यालयाच्या किल्ल्या जमा केल्या. या निवेदनात म्हटले, राज्यात एमआरईजीएस योजनेची अंमलबजावणी ग्रामसेवकांनी यशस्वीपणे केली आहे. यातील 80 टक्के काम ग्रामसेवकांनी केले. ग्रामसेवकांना केंद्र आणि राज्याच्या 138 योजनांची कामे करावी लागतात. यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल ग्राम अभियान, पर्यावरण संतुलन ग्रामसमृद्धी योजना तंटामुक्ती अभियान आदी योजनांत सहभाग नोंदवून यशस्वीपणे राबविल्या. ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी यांची वेतनश्रेणी एकच असल्याने त्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळत नाही. म्हणून सर्व संवर्गात नाराजी आहे. वेळोवेळी मागणी करूनही अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. असे निवेदनात म्हटले आहे.
या वेळी व्ही. ए. केवट, समाधान सोनुने, के. एस. राऊत, आर. एस. दौड उपस्थित होते. दरम्यान, आमच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. यासाठी शासन दरबारी युनियनच्या वतीने नेहमीच पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु शासनाकडून काहीच कार्यवाही होत नसल्याने अखेर काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे युनियनचे भोकरदन तालुकाध्यक्ष पांडुरंग सोनवणे यांनी सांगितले.

या आहेत मागण्या
वेतन त्रुटी दूर करावी, ग्रामपंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ कंत्राटी शिक्षकांप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून धरण्यात यावे, 20 ग्रामपंचायतीच्या मागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करावे, प्रवास भत्ता पगारासोबत तीन हजार रुपये करावा, शासनाच्या चुकीमुळे कंत्राटी ग्रामसेवकांना वेळेवर आदेश न मिळाल्याने पेन्शन योजनेचा लाभ द्यावा, अशा मागण्या आहेत.