आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामसेवकांच्या आंदोलनाने शैक्षणिक कामे रखडणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री - ग्रामसेवकांच्या न्याय्य मागण्या सोडवण्यास शासन चालढकल करत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी तालुक्यातील 66 ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले. तसेच कार्यालयीन शिक्के व ग्रामपंचायतीच्या किल्ल्या पंचायत समितीचे कक्ष अधिकारी जी. बी. येवतीवाड यांच्याकडे सुपूर्द केल्या.

ग्रामसेवक संवर्गाच्या न्याय्य मागण्यांसाठी 30 जून रोजी राज्यभर ग्रामसेवक संघटनांनी मोर्चे काढले होते. मात्र, या आंदोलनाची कसलीच दखल शासनाने घेतली नाही. त्यामुळे सरकार आपल्या मागण्या मान्य करण्यास मुद्दाम चालढकल करत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी ग्रामसेवक संघटनेच्या सर्व ग्रामसेवकांनी ग्रामवसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष एच. एन. पाथ्रे, सचिव व्ही. एस. ढेंगे, उपाध्यक्ष ए. ए. पठाण, करुणा इंगोले यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे कक्ष अधिकारी जी. बी. येवतीवाड यांच्याकडे 66 ग्रामपंचायतींचे सर्व शिक्के व कार्यालयाच्या चाव्या सुपूर्द करून बेमुदत काम बंद आंदोलनास सुरुवात केली.

सध्या दहावी व बारावीचे निकाल लागलेले आहेत. त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी, तसेच विविध फॉर्म भरण्यासाठी ग्रामसेवकांच्या सही शिक्क्यांची गरज असते. शिवाय यंदा पावसानेही अद्याप हजेरी लावली नसल्याने, तालुका पाणीटंचाईने होरपळत आहे. मजुरांच्या हाताला काम उरलेले नाही. अशा परिस्थितीत ग्रामसेवकांची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे शासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.